नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपासारखा धक्का बसला तरी जम्मू-काश्मीरमध्ये साकारत असलेल्या रेल्वे प्रकल्पाला कोणताही धोका होणार नाही, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या २५ एप्रिलपासून नेपाळमध्ये होत असलेल्या भूकंप मालिकेमुळे अभूतपूर्व जीवित व वित्तहानी झाली आहे. अगदी गेल्या आठवडय़ात बसलेल्या ताज्या धक्क्यांमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या अनुषंगाने नेपाळसह हिमालयाच्या परिसरातील भूगर्भ रचनेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या प्रदेशासह उत्तर भारताचा मोठा भाग भूकंपप्रवण असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. स्वाभाविकपणे या संपूर्ण प्रदेशात होत असलेल्या प्रकल्पांच्या सुरक्षिततेचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये उधमपूर ते बारामुल्ला या ३२६ किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यापैकी ३५ किलोमीटर लांबीचा सर्वात अवघड मार्ग उभारण्याची जबाबदारी कोकण रेल्वे महामंडळावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर प्रकल्प संचालक राजेंद्रकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, अशा स्वरूपाच्या भूकंपांमुळे या रेल्वे मार्गाला कोणताही धोका पोचणार नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.  नेपाळसह उत्तर भारतात गेल्या सुमारे तीन आठवडय़ांच्या काळात बसलेल्या लहान-मोठय़ा धक्क्यांमुळे या रेल्वे मार्गाची एक प्रकारे चाचणीच झाल्याचे नमूद करून राजेंद्रकुमार ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, झोन ५ या भूकंप प्रकाराचा, म्हणजे ८ रिश्टर स्केलपेक्षा जास्त धक्का पचवू शकण्याची क्षमता असलेला हा रेल्वे मार्ग आहे. त्याची तांत्रिक आखणी करताना तशी काळजी घेण्यात आली आहे. अलीकडे या भागात झालेल्या भूकंपांमुळे त्याची यशस्वी चाचणी झाली आहे. याचबरोबर मोठय़ा प्रमाणात हिमवृष्टी किंवा पाऊस पडला तरीसुद्धा या रेल्वे मार्गाला हानी पोचणार नाही. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरच्या गेल्या शंभर वर्षांतील नोंदींपेक्षा जास्त पाऊस पडला. तरीही या प्रकल्प उभारणीवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. प्रकल्पाची तांत्रिक रचना येथील निसर्ग व पर्यावरणातील संभाव्य बदल लक्षात घेऊन केलेली आहे. त्यामुळे मोठे भूकंप किंवा अतिवृष्टी पचवण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये निश्चितपणे आहे.