पायाभूत सुविधांबरोबरच पर्यटनाला वेगवान चालना देण्यासाठी महाराष्ट्राला जपानचे घसघशीत अर्थबळ आणि तंत्रबळ लाभणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात ११ सप्टेंबरला जपान आणि महाराष्ट्र सरकारमध्ये तसा सहकार्य करार होणार आहे. या करारानुसार मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा तसेच पुणे आणि नागपूर मेट्रोमध्ये जपान सहभागी होणार असून रायगड जिल्ह्य़ाला मुंबईच्या अधिक जवळ आणणाऱ्या ट्रान्स हार्बर रेल्वे प्रकल्पातही जपान महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबईच्या ‘आयआयटी’मध्ये जपानचा विशेष विभाग कार्यरत होणार आहे. सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची विशेष प्रचार मोहीम जपानमध्ये राबविली जाणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारला जाणार आहे. महाराष्ट्राचे अर्थकारण गतिमान करणाऱ्या या करारांची माहिती सरकारमधील वरिष्ठ सूत्रांकडून ‘लोकसत्ता’ला देण्यात आली.

मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ प्रकल्पाच्या विस्तारात जपानचा सहभाग लक्षणीय राहणार आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्य़ाच्या विकासाला त्यामुळे मोठी गती लाभणार असून कोकणही मुंबईच्या अधिक जवळ येणार आहे. या रेल्वे प्रकल्पात २२ किमी लांबीचा सहापदरी सागरी सेतु साकारणार आहे. यातील खाडीवरील १६.५ किमी लांबीच्या पुलाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील राष्ट्रीय महामार्ग ४-‘ब’वरील चिर्ले गाव जोडले जाणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणेही त्यामुळे सुलभ होणार आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जेआयसीए) या प्रकल्पाला वित्तपुरवठा करण्याची शक्यता आहे. तिचे सल्लागार सध्या प्रकल्पाचा आढावा घेत असून नोव्हेंबर २०१५मध्ये त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यावर प्रत्यक्ष काम सुरू होईल. मुंबई-अहमदाबाद अतिवेगवान रेल्वेमार्गातही जपानचे सहकार्य लाभणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील आर्थिक विकासाला गती लाभण्याची शक्यता आहे. उद्योग, नवी मुंबई सेझ, स्मार्ट शहरे या क्षेत्रांतही महाराष्ट्राला जपानचे अर्थबळ आणि तंत्रबळ लाभणार आहे.
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा
जपानमधील बौद्धमताचे केंद्र मानल्या जाणाऱ्या कोयासन पर्वतराजीतील कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. याद्वारे भारत-जपान सांस्कृतिक मैत्रिपर्वाचा पायाच रचला जाणार आहे. बौद्ध धर्मीयांच्या मनात आत्मीय स्थान लाभलेल्या अजंठा-वेरुळसारख्या पर्यटनस्थळांसाठी जपानच्या दोन प्रमुख शहरांत मोठी प्रसिद्धी मोहीमही राबविली जाणार आहे.