जपानमधील मिझुहो बँकेशी राज्य सरकारने करार केला असून अनेक जपानी कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. जपानमधील तीन कंपन्यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहमतीपत्र दिले आहे.

मिझुहो बँकेशी जपानमधील ७० टक्के कंपन्या जोंडल्या गेल्या असून फॉच्र्युन १००० मधील सुमारे २५० हून अधिक कंपन्यांबरोबर बँकेचे व्यावसायिक सहकार्य आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत एमआयडीसी आणि मिझुहो बँक यांच्यात शनिवारी करार करण्यात आला. जपानमधील इलेक्ट्राईक कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नोबोरु मत्सुनामी यांनी ईट्राईक ऑटोरिक्षाचे उत्पादन महाराष्ट्रात करण्याची तयारी दाखविली आहे. ए टू केअर औषधनिर्माता कंपनीचे अध्यक्ष हिरोशी ओकामोटो यांनीही सरकारला उद्योग सुरु करण्यासाठी सहमती पत्र दिले आहे. ए एस ब्रेन कंपनीने व्यवसाय सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले.नायडेक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागामोरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इलेक्ट्रिक मोटर्स उत्पादन करणाऱ्या कंपनीने राज्यातउच्चाधिकाऱ्यांचे पथक पाठविणार असल्याचे सांगितले.