वरच्या धरणांतून मराठवाडय़ासाठी जायकवाडी प्रकल्पात किती पाणी सोडता येऊ शकेल याचे नियोजन राज्य सरकारने करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली. नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील गरज व मराठवाडय़ातील मागणी लक्षात घेऊन हे नियोजन करण्याची सूचना करतानाच आघाडी सरकारच्या काळात समन्यायी पाणीवाटप कायदा झाल्याची आठवणही तटकरे यांनी या वेळी करून दिली.
जायकवाडीत सध्या चार टक्केच उपयुक्त जलसाठा असल्याने पुढची वाट न पाहता या महिन्यातच वरच्या भागातून पाणी सोडण्याची मागणी मराठवाडय़ात दुष्काळ प्रश्नावर जेलभरो आंदोलन करणारा राष्ट्रवादी पक्ष का करीत नाही, या प्रश्नावर तटकरे बोलत होते. राष्ट्रवादीचे जेलभरो आंदोलन पक्षाच्या विस्तारासाठी नाही. यापूर्वीही दुष्काळ प्रश्नी पक्षाध्यक्ष शरद पवार व पक्षाचे अन्य नेते तीन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र सुटत नसल्याचा अनुभव येत असल्याने आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. एकनाथ खडसे हाडाचे शेतकरी असून या वर्षी उसाचे गाळप बंद ठेवण्याबाबत ते का बोलले, हे समजू शकत नाही. पाऊस नाही म्हणून ऊस नसला तर पुढच्या वर्षीच्या गाळपाबाबत कोणाचे वक्तव्य आले असते तर समजले असते. परंतु असलेल्या उसाचे गाळपच करायचे नाही म्हणजे काय, हेच कळत नाही, असे तटकरे म्हणाले.
पर्यूषण पर्वानिमित्त मांसविक्रीवर विशिष्ट काळासाठी बंदी घालण्याच्या निर्णयाबाबत, अतिरेकाचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात दोन्ही बाजूंनी समन्वय साधला पाहिजे. आघाडी सरकारच्या काळातील कामे व निर्णयाबाबत कोणत्याही चौकशीचे आम्ही यापूर्वी स्वागतच केले आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली तर त्यास आमची हरकत असण्याचे कारण नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी दुष्काळास शरद पवारच जबाबदार असल्याच्या आरोपावर अलीकडेच टीका केली. त्यावर बोलताना तटकरे यांनी, या वयात त्यांना कोणी विचारत नव्हते. त्यामुळे पवार यांच्यावर आरोप केल्याने प्रसिद्धी मिळेल, या हव्यासापोटी विखे बोलले असतील. विखे अनेक वेळा पक्ष बदलामुळेही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसमध्ये ते होते आणि शिवसेनेतही गेले होते. त्यांना जनता आता विसरली आहे. त्यामुळे पुन्हा लोकांसमोर येण्यासाठी असे वक्तव्य केले असावे. त्यांच्या अशा वक्तव्यामागे राजकीय कारण असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले. आघाडी सरकारच्या काळात आपण जलसंपदा मंत्री असताना मराठवाडय़ातील दुष्काळी जनतेसाठी वरच्या धरणांतून आठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी विखे यांनीच विरोध केला होता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.