जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ मिरखेल स्थानकावर भाकपचे कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रेल्वेरोको आंदोलन केले.
जिल्ह्यात पावसाने दगा दिल्याने खरीप पिकांचे उत्पादन घटले. अनेक ठिकाणी रब्बीची पेरणीही झाली नाही. दुष्काळात शेतकऱ्यांना जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने दोन पाणी पाळ्या देण्याचे जाहीर करुनही २५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या आवर्तनाचे पाणी मिरखेल परिसरातील व बी ७० कालव्यावरील शेतकऱ्यांना दिले नाही. उलट आवर्तन पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य कालवाही बंद करण्यात येत आहे. १२२ कि.मी. कालव्यावर ११००-१२०० क्युसेक दाबाने पाणी देऊन जिल्ह्यासाठी ७४ दलघमी पाणी देण्याचे नियोजन असताना प्रत्यक्षात केवळ ३२ दलघमी पाणी देऊन मुख्य कालवा बंद करण्यात येत आहे. दिलेले पाणीही ७००-९०० क्युसेक दाबाने दिल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी देण्याची तरतूद असताना हेतूत: पाणी बंद करण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. वास्तविक, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जायकवाडीच्या वरच्या बाजूच्या धरणांतून आवश्यक व पुरेसा पाणीसाठा ६५ टक्क्य़ांपर्यंत घेऊन ऑक्टोबर अखेपर्यंत जायकवाडीत मुबलक पाणी उपलब्ध करावे, असा न्यायालयीन निकालही १९ सप्टेंबरला जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला. मात्र, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाने याची अंमलबजावणी केली नाही. आता जायकवाडीचा पाणीसाठा ३३ टक्क्य़ांपेक्षा कमी होत असल्याचे कारण पुढे करुन जायकवाडी कालव्याचे पाणी बंद करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. आंदोलनात उद्धव देशमुख, संदीप सोळुंके यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.