राष्ट्रपती पदाची निवडणूक नजरेसमोर ठेवून भाजपा शिवसेनेला गोंजारत असल्याचे विधिमंडळातील राष्ट्रवादीचे गटनेते आ. जयंत पाटील यांनी इस्लामपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, असे भाकीतही त्यांनी या वेळी वर्तवले.

राज्यात महायुतीची सत्ता असली तरी सर्व निर्णय हे भाजपाकडून घेतले जात असल्याचे सांगत आ. पाटील म्हणाले की, शिवसेनेला राज्यात सत्तेपासून बाजूला जायची इच्छा दिसत नाही. सत्तेत राहण्यावाचून सेनेला दुसरा पर्यायच सध्या तरी उपलब्ध नाही. भाजपाही राष्ट्रपती पदाची निवडणूक नजरेसमोर ठेवून सेनेला गोंजारत असून सेनेकडे असलेली मते भाजपाला हवी आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी ही शासनाला द्यावीच लागणार आहे. मात्र शासन यासाठी निवडणुकीचा मुहूर्त पाहत असल्याचे सांगत आ. पाटील म्हणाले की, राज्यात शासनाबद्दल असंतोष मोठय़ा प्रमाणात पाहण्यास मिळत आहे. निवडणुकीमध्ये शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट दर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचा शासनाला विसर पडला आहे.

याचा जाब शेतकरी जागोजागी विचारत आहेत.  जीएसटीबाबत त्यांनी सांगितले की, या कररचनेमुळे दीर्घकाळ लाभ होणार असला तरी याची तयारी मात्र केल्याचे दिसत नाही. यामुळे १ जुलपासून हा कर लागू करण्याऐवजी मुदत घेऊन लागू करणे हिताचे ठरेल. राज्य शासनाची आíथक स्थिती समाधानकारक नाही. अपेक्षित महसूल जमा होत नाही.

उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्कचे उत्पन्न कमी झाले असून याची भरपाई कशी करणार? नोटबंदी व दारूबंदीचे परिणाम अर्थकारणावर झाले आहेत.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वादाबाबत आ. पाटील यांनी मी यावर काय बोलणार? असे म्हणत बोलणे टाळले.