जयवंत जाधव यांचा आरोप

शहर विकास नियंत्रण नियमावलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांचा विश्वासघात केला आहे. नियमावलीमध्ये अनेक जाचक अटी टाकल्यामुळे नाशिकच्या विकासाला खीळ बसणार असल्याने मुख्यमंत्र्यांचे नाशिकला ‘दत्तक’  घेण्याचे विधान केवळ निवडणुकीपुरते होते काय, अशी टीका आ. जयवंत जाधव यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक शहर नियंत्रण विकास नियमावली समाजमाध्यमांमध्ये ‘व्हायरल’ झाली. त्यावेळी याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर प्रचार सभेत निवडणुका लक्षात घेत सदर नियमावली ही कोणाच्या तरी कल्पनेतून तयार झाली असल्याचे सांगितले होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही हे सर्व काही फेटाळून लावले होते. मात्र महापालिका निकालानंतर ती नियमावली जशीच्या तशी नाशिक महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्याने पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे पितळ उघडे पडले असल्याचे जाधव यांनी सांगितले. भाजप सरकारने महापालिका निवडणुकीच्या काळात वेळ मारून नेली, मात्र निवडणूक होताक्षणी नाशिककरांची घोर फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाशिक महापालिकेची सत्ता माझ्या हातात द्या, तुमचे नाशिक मी पाच वर्षांंसाठी दत्तक घेतो, अशी भावनिक साद घातली. नाशिककरांनीही त्याला तेवढाच प्रतिसाद देत भाजपला निर्विवाद बहुमत दिले. त्यामुळे शहराचा सर्वात मोठा प्रश्न असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीतून नाशिककरांना दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, निवडणुकीच्या निकालाच्या सायंकाळी शासनाच्या वतीने माध्यमांवर फिरणारी नाशिकची विकास नियंत्रण नियमावली प्रत्यक्षात जशीच्या तशी शिक्के मारून प्रसिद्ध केली. या नियमावलीत नऊ मीटरखालील रस्त्यांवर टीडीआर नसल्याचेच सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील जुन्या नाशिकचा गावठाणाचा भाग हा विकासापासून कोसो दूर राहणार आहे. याशिवाय इमारतीतील कपाटाचा मुद्दा देखील भिजत राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहराची घोर निराशा केली आहे. दिलेला शब्द पाळण्याची नियत असेल तर मुख्यमंत्र्यांनी या नियमावलीचा पुनर्विचार करून सदर शहर नियंत्रण विकास नियमावलीतील जाचक अटी रद्द करून नाशिककरांना दिलासा द्यावा, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.