शहरातील नागरिक व शहरात येणाऱ्या प्रवाशांची तहान भागवण्यासाठी येथील संवेदनशील पत्रकार सुनील तिवारी यांनी एक नवी युक्ती अंमलात आणली असून स्वत:च्या दुचाकीवर वाटसरूंची तहान भागवण्यासाठी त्यांनी फिरती पाणपोई सुरू केली आहे. यात थंड पाणी वाटसरूंना मोफत देण्यात येत आहे. सोबतच या पानपोईवर ‘पाणी वाचवा’ असा संदेश असून जनजागृतीही केली जात आहे. शहरात चालत्या फिरत्या पाणपोईचा हा पहिलाच उपक्रम आहे.

राज्यभरात पाणीटंचाई निर्माण झाली असून लोक पाण्यासाठी वणवणतांना दिसत आहे. कुठे साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. मात्र, सुनील तिवारी या समाजसेवकाने नागरिक व वाटसरूंना पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही भटकावे लागणार नाही, याची खबरदारी घेऊन स्वत:च दुचाकीवर दररोज वाटसरूंची तहान या माध्यमातून भागवत आहे. पाण्यासाठी एकीकडे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात तळ गाठलेल्या विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्यासह असल्या नसल्या पाण्यावर भांडे घासत आहे. थेंबभरासाठी भावा-भावात भांडणे सुरू असून बाटलीभर रक्त काढायला निघालेले असताना या उपक्रमाचे महत्व अधोरेखित होते.

या शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून पाणपोईंची संख्या कमी होत आहे. त्यांनी स्वत:च्या दुचाकीवर दररोज तहानलेल्या वाटसरूंसाठी ५०० रुपयांचे थंड पाणी देत आहेत. त्यांच्याकडे चारचाकी असूनही ते चंद्रपुरातील रणरणत्या उन्हात डोक्याला दुपट्टा बांधून  दुचाकीने शहरातील कामे करायला आपली फिरती पाणपोई घेऊन निघतात. त्यांची गाडी जेथे जेथे थांबते तेथे तेथे नागरिक थंड पाण्याने आपली तहान निवांत भागवत आहेत. उन्हाळा सुरू होताच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक संघटनांकडून विविध ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन करून वृत्तपत्रातून चमकोगिरी केली जाते. मात्र, कोणतीच पाणपोई निरंतर सेवा देऊ शकत नाही. या फिरत्या पाणपोईवर ‘पाणी वाचवा’ असा संदेश सुद्धा लिहिण्यात आला आहे.

दिवसभरात ५०० नागरिकांना लाभ

या सर्व संदर्भात ते म्हणाले की, आज घोटभरासाठी माणसाची तडफड बघून लोकसेवेच्या भावनेतून हा उपक्रम राबवताना आनंद वाटतो. शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून पाणपोईची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकतांना अनेकदा बघितले, त्यामुळे विचार केला की, आपल्या हातून सुद्धा काही तरी सेवा या तहानलेल्यासाठी झाली पाहिजे. त्यामुळे स्वखर्चाने दुचाकीला एक लोखंडी ढाचा बसवून त्यात दोन ग्लास व एक थंड पाण्याची २० लीटर क्षमतेची कॅन बसवली आहे. दररोज १० कॅन्समधून दिवसभरात ५०० नागरिकांना याचा लाभ होत आहे.