पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांनी चिंतन व आत्मपरीक्षण करावे. पेडन्यूज हा प्रकार पत्रकार व्यवसायाला बदनाम करणारा आहे. पत्रकारांनी कोणाच्याही खिशात व पाकिटात बसू नये. समाजातील ९० टक्के लोकांच्या मागे उभे राहून समाजाचे प्रश्न वेशीवर टांगावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. वाचक व ग्राहक यांच्यातील फरक जाणा असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ व कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजित पत्रकार दिन पुरस्कार सोहळ्यात कै. आप्पासाहेब पटवर्धन गोपुरी आश्रयात मधुकर भावे बोलत होते.
यावेळी जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गजानन नाईक, परिषद प्रतिनिधी शशीकांत सावंत, आयबीएन लोकमतचे अमेय तिरोडकर, बांधकाम कार्यकारी अभियंता पी. जोशी, दिलीप भावे, राजेंद्र मुंबरकर, माधव कदम, आर. टी. मर्गज, अशोक करंबेळकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, छायाचित्रकार मोहन बने, नाटय़समीक्षक प्रदीप वैद्य, डॉ. निगुडकर, बाबा पटेल, श्री. घाडी गुरुजी, गणेश जेठे, संतोष राऊळ, माहिती अधिकारी संध्या गरवारे व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मधुकर भावे म्हणाले, तुम्ही समाजाचा आरसा आहात, त्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोण सकारात्मक असावा. कोकणातील दोनशे मान्यवरांची जागतिक स्तरावर महती आहे. त्यामुळे तुम्ही त्याची जाणीव ठेवून आजच्या दिनी चिंतन व आत्मपरीक्षण करत समाजासमोर आदर्शवादी पत्रकारिता ठेवा, असे सांगताना राजकीय माणसाप्रमाणे पत्रकारांची विश्वासार्हता घटत आहे असे स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या गढूळ वातावरणाचे पाणी अडविण्यासाठी पत्रकारांना देहाचा बांध करावा लागेल असे सांगून श्री. भावे म्हणाले, कोणाच्या खिशात व पाकिटात बसू नका. ज्यांचा कोणी नाही त्यांचे तुम्ही बना. समाजाचे प्रश्न वेशीवर टांगा. नकारात्मक विचार सोडून समाजात ९० टक्के चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना लेखणीची ताकद द्या, असे आवाहन श्री. भावे यांनी केले.
आजच्या मोबाईल पिढीसमोर इतिहास ठेवा तसेच वाचक व ग्राहक यांच्यातील फरक ओळखून वाचक निर्माण करणारी पत्रकारिता बनवा असे सांगताना भावे म्हणाले, पदरात निखारे घेऊन चालायचे आहे याचे भान ठेवून सकारात्मक पत्रकारिता करून समाजाला वळवा. पत्रकारांनी वाचनावर भर दिला पाहिजे, असे आवाहन करून पत्रकारांनी समाज घडविला पाहिजे. पुढच्या काळात राजकारण समाज घडवेल असे वाटत नाही ती जबाबदारी पत्रकार व शिक्षकावरच राहील असे त्यांनी म्हटले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकारिता पुरस्काराने अभिमन्यू लोंढे यांना श्री. भावे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी पुरस्काराची रोख रक्कम लोंढे व श्री देसाई यांनी जिल्हा पत्रकार भवनासाठी दोघांनीही जिल्हा पत्रकार संघाकडे अनुक्रमे पाच हजार व तीन हजार पाचशे रुपये परत दिली.
कणकवली तालुका पत्रकार समितीचे पुरस्काराने पत्रकार माधव कदम, कलावंत बाबा पटेल, उद्योजक आर. टी. मर्गज, छायाचीत्रकार संजय राणे यांना श्री. भावे यांनी सन्मानित केले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, परिषद प्रतिनिधी शशिकांत सावंत, तालुका अध्यक्ष संतोष राऊळ, दै. लोकसत्ता प्रतिनिधी अभिमन्यू लोंढे, आयबीएन लोकमतचे अमेय तिरोडकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, श्री. घाडी गुरुजी, प्रदीप जोशी, माधव कदम, आर. टी. मर्गज, बाबा पटेल आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी पत्रकार मधुकर भावे, अमेय तिरोडकर आदींचा सत्कार करण्यात आला. पत्रकार शाम सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
निसर्ग संपन्न भागात पत्रकार दिन साजरा करण्यात आल्याने मधुकर भावे म्हणाले, पत्रकार दिनाची ही सावली महाराष्ट्रात उन्हात वावरणाऱ्या जनतेला मिळूदे, अशी प्रार्थना केली. आभार प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी मानले.