बीड येथील सभेत कन्हैयाकुमार याचा आरोप

भारतात वर्षांला बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि पीकविमा घेणाऱ्या कंपनीला वर्षांकाठी दहा हजार कोटी रुपयांचा नफा होतो. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी साठ हजार कोटी रुपये खर्च होतात. तितका पसा शेतकऱ्यांना दिला तर आत्महत्या होणार नाहीत. मात्र, व्यवस्थेच्या नावाखाली देशात तमाशा सुरू आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात असून तरुणांनीच आता खऱ्या-खोटय़ातील फरक ओळखून आवाज उठवावा, असे आवाहन विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात जाऊन देश विकणे बंद करावे. विदेशात फिरून, सूट बदलून देश बदलणार नाही, असा थेट टोलाही लगावला.

बीड येथे एआयएसएफआय आणि परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने रविवारी संविधान बचाव लाँग मार्च, रोहित अ‍ॅक्ट परिषद विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्या उपस्थितीत झाली. यावेळी फिडेल चव्हाण, अ‍ॅड. करुणा टाकसाळ, अंबादास आगे, मोहन जाधव, प्रा. सुशीला मोराळे, अशोक हिंगे आदी उपस्थित होते. सभेला मोठय़ा संख्येने गर्दी होती.

कन्हैयाकुमार म्हणाले, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार या विषयावर सरकारला जाब विचारावा लागेल. आत्मसन्मानासाठी झगडावे लागेल. नरेंद्र मोदी देशाने निवडून दिलेले पंतप्रधान असल्याने आम्हालाही संसदीय मार्गाने प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. त्यांनी हिटलरची चाल चालवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. मोदी यांनी आपण अपराजित आहोत या भ्रमात राहू नये असे सांगून एक देश एक टॅक्स या धोरणाप्रमाणेच एक देश एक न्याय, एक शिक्षण व्यवस्था का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी थापाडय़ा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही त्याने केले.

शिक्षण व्यवस्था बंद करण्याचे षङ्यंत्र

जाहीर कार्यक्रमापूर्वी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याची प्रा. डॉ. हमराज उईके यांनी मुलाखत घेतली. यावेळी कन्हैयाकुमार म्हणाला, मी एका गरीब कुटुंबातून आलेला विद्यार्थी आहे. गरीब असणे हा गुन्हा आहे का? मात्र सध्या गरीब असाल तर चोर, बेईमान, दंगलखोर, देशद्रोही काहीही ठरवले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला शिकण्याचा सल्ला दिला होता. कारण शिक्षण घेतले तर आम्ही प्रश्न विचारू, होणारे शोषण थांबवू. शोषित वर्ग शिकला तर प्रश्न विचारेल म्हणून केंद्र सरकारकडून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले केले जात आहेत आणि सामान्यांनी शिकूच नये, अशी व्यवस्था पुढे आणली जात आहे. नरेंद्र मोदींनी ३५ व्या वर्षी एम. ए. केले तर तिसाव्या वर्षी मी पीएच.डी. केली, माझ्यावर प्रश्न उपस्थित होतात. आम्ही शिकलो तर गुलामी कोण करणार? त्यामुळे सामान्यांचे शिक्षण बंद केले जात आहे. मोदींच्या विदेश दौऱ्यावर जेवढा पसा खर्च होतो त्याच्या निम्म्या पशात शिक्षण व्यवस्था मजबूत होऊ शकते, असे मत कन्हैयाकुमार याने व्यक्त केले.