कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांना पुन्हा मोठा झटका बसला. राणेंविरोधात बंड करून उमेदवार उभा केलेल्या संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांची नगराध्यक्षपदी तर त्यांच्या गटाच्या कन्हैया पारकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. शिवसेना आणि भाजपने मदतीचा हात दिल्यामुळे माधुरी गायकवाड आणि कन्हैया पारकर यांचा विजय सोपा झाला. राणे यांच्या नेतृत्त्वाविरोधात बंड केलेल्या संदेश पारकर यांचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यामुळे नारायण राणे यांना घरचा आहेर मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभव आणि आता कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवामुळे राणेंपुढील अडचणीत आणखी वाढ झाल्याचे चित्र आहे.
कणकवली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माधुरी गायकवाड आणि राणे गटाच्या सुविधा साटम यांच्यात लढत होती. गायकवाड यांना एकूण नऊ मिते मिळाली. त्यामध्ये शिवसेनेची चार, भाजपचे एक आणि पारकर गटाच्या चार मतांचा समावेश आहे. साटम यांना आठ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कन्हैया पारकर यांना ९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी बंडू हरणे यांना ८ मते मिळाली.
राणेंमुळेच काँग्रेसमध्ये आलेल्या संदेश पारकर यांनी या निवडणुकीत थेट राणेंनाच आव्हान देत स्वतःचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा केला होता. राणेंच्याविरोधामुळे शिवसेना आणि भाजपने आपली मते पारकर यांच्याच पारड्यात टाकली. त्याचा निवडणुकीत त्यांच्या गटाला थेट फायदा झाला.
मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संदेश पारकर काही वर्षांपूर्वी नारायण राणे यांच्या गटामध्ये आले होते. मात्र, राणे गटातील नेते आपल्याला विश्वासात घेत नाहीत. यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. त्यामुळेच त्यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता.