येळ्ळूरमधील अत्याचारग्रस्तांची भेट घेण्यासाठी निघालेले शिवसेना नेते दिवाकर रावते यांना शुक्रवारी कर्नाटक पोलीसांनी अडवले आणि त्यांना महाराष्ट्रात परत जाण्याची सूचना केली. बेळगाव आणि लगतच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचे आहे, ते महाराष्ट्रात जाऊन बोला, अशी सूचना कर्नाटक पोलीसांनी दिवाकर रावते यांना केली. त्याचबरोबर तुम्हाला येळ्ळूरमध्ये जाता येणार नाही आणि तिथे पत्रकार परिषदही घेता येणार नाही, असे कर्नाटक पोलीसांनी रावते यांना सांगितले.
येळ्ळूरच्या दिशेने निघालेल्या रावतेंना पोलीसांनी शुक्रवारी सकाळी बेळगावमधील पंचमुखी हॉटेलच्याजवळच अडवले आणि त्यांना परत जाण्याची सूचना केली. बेळगाव आणि लगतच्या भागात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. इथे जमावबंदी आहे. त्यामुळे तुम्ही येळ्ळूरमध्ये गेला तर शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत पोलीसांनी त्यांना परत जाण्याची सूचना केली.