महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच असून रविवारी बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळुर गावात असलेला ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळुर’ हा फलक काढून टाकरण्यात आला. या प्रकारास विरोध करणाऱ्या मराठी भाषकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यामध्ये लहान मुले, स्त्रिया यांच्यासह ५० हून अधिक जण जखमी झाले. गावात जमावबंदी करण्यात आली असून, सात जणांना अटक करण्यात आली असली तरी ही वरवरची कारवाई असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने या लाठीमारीचा निषेध नोंदवला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी कर्नाटक प्रशासनाने येळ्ळुर गावातील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळुर’ नावाचा फलक काढून टाकला होता. त्याला प्रतिउत्तर देत अवघ्या २४ तासांत मराठी भाषकांनी शनिवारी हा फलक पुन्हा उभा करून मराठी बाण्याचे दर्शन घडवले. यामुळे कर्नाटक शासनाचा तिळपापड झाला. त्यांनी फलक काढून टाकण्याच्या दिशेने शनिवारी रात्रीपासूनच हालचाली सुरू केल्या. प्रचंड पोलीस फौजफाटा घेऊन कर्नाटक पोलीस व प्रशासन येळ्ळुर गावात दाखल झाले आणि त्यांनी हा फलक काढून टाकला. त्यामुळे दुखावलेल्या मराठी भाषकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. पण कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीमार करून मराठी भाषकांना घटनास्थळावरून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. संतप्त पोलिसांनी मराठी भाषकांची घरे लक्ष्य करत प्रचंड नासधूस केली, वाहनांचीही मोडतोड केली.
दरम्यान, सायंकाळी बंगळुरूचे पोलीस महानिरीक्षक हेमंत िनबाळकर यांनी येळ्ळुरला भेट देऊन पाहणी केली. एकीकरण समितीच्या नेत्यांसह ग्रामस्थांची बठक घेतली. या वेळी एकीकरण समितीने पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला.
सरकारची कोंडी
मुंबई : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते हादरले असतानाच आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधींनी विरोधात टोकाची भूमिका घेतल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली आहे. आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधीचे मत जाणून घेतल्यावरच पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.