कपाळी अष्टगंध, बुक्का याचा टिळा, मुखी पुंडलिक वरद हा घोष, खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका यांनी पंढरी नगरी गजबजून गेली असून सुमारे ३ लाख भाविक, भक्त वारकरी यांच्यासमवेत काíतकी एकादशीचा सोहळा संपन्न झाला.
महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या हस्ते आज सकाळी काíतकी एकादशीची महापूजा पार पडली. महसूलमंत्री यांच्यासमवेत पूजेचा मान दर्शन रांगेतील पहिले वारकरी सुरेश कुलकर्णी (दीपकनगर, तरोडा, जि.नांदेड ) व त्यांच्या पत्नी वंदना कुलकर्णी यांना मिळाला. समितीच्या वतीने त्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा एस.टी.महामंडळाचा पास देण्यात आला. या वेळी अण्णा डांगे, आमदार सुरेश खाडे, राणा जगतसिंह पाटील, दत्तात्रय सावंत, पुणे विभागीय महसूल आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, ग्रामीण पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, माजी आमदार उल्हास पवार, शिवाजीबापू कांबळे, प्रांत तथा मंदिर समितीचे अधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव उपस्थित होते.
कालपासून पंढरीत वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. एकादशीच्या निमित्ताने पंढरीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्नानासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. यामुळे पहाटेपासूनच चंद्रभागा नदीवर वारकऱ्यांनी स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. बेसुमार वाळू उपशामुळे हे पाणी पोहोचण्यास उशीर झाल्याचे बोलले जाते. या स्नानानंतर हे हजारो वैष्णवजनांनी मुख्य मंदिराकडे धाव घेतली. यामुळे सारी पंढरी नगरीच भक्तिमय होऊन गेली होती. प्रत्यक्ष पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर येथील पत्राशेड येथे गेली होती. ज्यांना विठ्ठल दर्शनाचा लाभ झाला नाही. अशांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी एकादशीच्या दुपारी विठ्ठलाच्या चांदीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाविकांनी या मूर्ती, रथावर खारीक, खोबरे, बुक्क्य़ाची उधळण केली.
दुपारनंतर हे भाविक पंढरीचा निरोप घेत आपआपल्या गावांकडे परतू लागले. यात्रेसाठी चंद्रभागा एस.टी.स्टँड, नवीन बसस्थानक व तसेच तात्पुरत्या स्वरूपात अशी काही बसस्थानके उभी केली होती. ही सारी स्थानके भाविकांनी गजबजून गेली होती. रेल्वे स्टेशनवरही भाविकांची मोठी गर्दी होती.
नुकताच काही भागात झालेल्या पावसामुळे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. याचा काíतकी यात्रेवर परिणाम झाल्याचे जाणवत होते. या झालेल्या पावसामुळे विशेषत कोकण विभागात याचा परिणाम मोठय़ा प्रमाणात झाल्याने काíतकी यात्रेला येणाऱ्या कोकणवासीयांचे प्रमाण फारच कमी होते. तसेच हा पाऊस सर्वत्र झाल्याने त्याचा परिणाम काíतकी यात्रेवर जाणवला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात भरणारी काíतकी यात्रा ही या वेळी २५ ते ३० टक्के कमी प्रमाणात भरली. असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. यंदा कमी प्रमाणात भरलेली काíतकी यात्रा याचा परिणाम येथील उद्योग, व्यापार यांच्यावरही झाला आहे.

जनावरांचा बाजार फुलला
काíतकी यात्रेच्या निमित्ताने येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. यंदा या बाजारात खिलार, गायी, वासरे, खेंडे, वळू तसेच गवळारू, गायी, म्हशी, रेडे, पंढरपुरी म्हशी तसेच घोडय़ांची मोठी आवक झाली होती. घोडेही मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. तसेच जनावरांच्या घुंगरू माळा, दोर, लगाम, छाती पट्टे, खोगीर याचीही दुकाने थाटली आहेत.