सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलाच जोर पकडला असून बुधवारी सकाळी कसारा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने नाशिक-मुंबई दरम्यानची रस्ते व रेल्वेची वाहतूक सहा ते सात तास विस्कळीत झाली. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाडय़ा ठिकठिकाणी अडकून पडल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले तर रस्ते मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या. मातीचे ढिगारे बाजुला हटविल्यानंतर दुपारी रस्ते मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली तर ‘अप’ मार्गावरील तुटलेली ‘ओव्हरहेड वायर’ दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू असल्याने घाटातील एका रेल्वे मार्गावरून ‘अप’ व ‘डाऊन’ या दोन्ही बाजुकडील वाहतूक संथपणे सुरू करण्यात आली. तत्पुर्वी, मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर लांब पल्ल्याच्या काही गाडय़ा मनमाड-दौंड-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या पावसाने नाशिकला चांगलेच झोडपले असून मागील चोवीस तासात तब्बल ८६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी दारणा धरणाचा विसर्ग २४,५९२ क्युसेक्सवर गेल्यामुळे दारणा नदीने धोकादायक पातळी गाठली आहे. यामुळे ५० हून अधिक गावांचा घोटीशी संपर्क तुटला असून परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली. गंगापूर धरणातून पाणी न सोडताही गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरण ७० टक्के भरल्याने नाशिक शहरावरील पाणी टंचाईचे सावट दूर झाले आहे. शहरातील पाथर्डी फाटा भागात संरक्षक भिंत झोपडय़ांवर कोसळून एक९ ठार तर सहा जण जखमी झाले. जखमी व मृत हे सर्व बांधकामावरील मजूर आहेत. काझी गढी भागात काही घरांची स्थिती धोकादायक झाल्यामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अंजनेरी येथे ओढय़ाला आलेल्या पुरात सुनिता चव्हाण (१७) ही युवती वाहून गेली.
मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात बुधवारी ठिकठिकाणी दरड कोसळून घाटातील दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. तर घाटातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर बोगद्याच्या बाहेरील भागात दरड कोसळून अप मार्गावरील ओव्हर हेड तुटली आणि या मार्गावरील वाहतूक बंद झाली. काही रेल्वेगाडय़ा मनमाड, नाशिकरोड, लहवीत, इगतपुरी या ठिकाणी थांबविण्यात आल्या तर काही गाडय़ांचे मार्ग खंडित करून त्या माघारी वळविण्यात आल्या.  वाराणसी-मुंबई महानगरी एक्सप्रेस, पाटणा-मुंबई एक्सप्रेस आणि गोरखपूर-मुंबई गोदान एक्सप्रेस या तीन गाडय़ा मनमाड-दौंड-पुणे-कल्याण या मार्गाने मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. मुंबईहून ३१ जुलै रोजी मध्यरात्री १२.१० वाजता सुटणारी महानगरी एक्स्प्रेस आता ३१ जुलै रोजी सकाळी ११.०५ वाजता सुटणार आहे.