जम्मू-काश्मीरमधील आपदग्रस्तांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे मूळ वेतन देण्याचे ठरविले.
राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या वतीने सर्व विद्यापीठांना जम्मू-काश्मीर आपद्ग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यास प्रतिसाद म्हणून विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी यांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. धनराज माने, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन यांची उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
विद्यापीठातील सर्वानी मिळून एक दिवसाचे मूळ वेतन आपदग्रस्तांना द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केले. बामुटातर्फे अध्यक्ष डॉ. सुरेश गायकवाड व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी यास प्रतिसाद दिला. यापूर्वीही विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांनी दुष्काळग्रस्त निधी दिला होता, असे कुलसचिव डॉ. माने यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे यांनी या वेळी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. आपले कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईक यांना मतदान करण्याचे, या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जवळपास ७०० शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.