गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरात जाऊन दिवाळी साजरी करीत तेथील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काश्मीरचे वातावरण चांगले झाले होते. परंतु त्यानंतर तेथील प्रश्नाची सोडवणूक झाली नाही, उलट, हा प्रश्न उत्तरोत्तर चिघळत चालला आहे. या प्रश्नावर मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन पसस्पर सामंजस्याने मार्ग काढण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

संसदीय कारकीर्दीला अखंड पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पवार यांचा सोलापुरात सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा झाला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या हस्ते पवार यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, सोलापुरी चादर देऊन सत्कार करण्यात आला. नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उस्मानाबादचे माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आदींची उपस्थिती होती.

पवार यांनी आपल्या भाषणात सोलापूर जिल्हय़ानेच आपली राजकीय व सामाजिक जडणघडण केल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. १९७२-७३ साली आपण सोलापूरचे पालकमंत्री होतो. त्या वेळी येथे एकत्र नांदणाऱ्या विविध धर्म-जाती-पंथ व भाषकांच्या संस्कृतीने समाजातील सर्व घटकांना सोबत कसे घेऊन पुढे जायचे, हे शिकायला मिळाले. १९७२ सालच्या दुष्काळातही सोलापूरकरांनी आपणास प्रेमाचा ओलावा दिला. हे ऋणानुबंध आपण कधीही विसरू शकत नसल्याचे नमूद करताना पवार यांनी, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, नामदेवराव जगताप, आप्पासाहेब काडादी, रंगाअण्णा वैद्य, रंगलाल तोष्णीवाल, विश्वनाथप्पा बनशेट्टी, बाबुराव चाकोते, ईरय्या बोल्ली, रामकृष्णपंत बेत, भीमराव जाधव गुरुजी आदींचे स्मरण केले. ज्येष्ठ सहकारी युन्नूसभाई शेख यांचाही नामोल्लेख केला. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी विकासाची दृष्टी दिली तर नामदेवराव जगताप यांच्याकडून संघटनकौशल्य शिकायला मिळाले. झुंजार संपादक रंगाअण्णा वैद्य हे १९७२ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी आपणास घरी चहापानासाठी आमंत्रित केले. लोकशाहीत जयपराजय होतच असतो. परंतु वैयक्तिक सलोखा जपावा लागतो, हा रंगाअण्णांनी त्या वेळी दिलेला मंत्र आपण कायम लक्षात ठेवला, असाही पवार यांनी उल्लेख केला. सदैव दुष्काळाने पछाडलेल्या सोलापूर जिल्हय़ात उजनी धरणामुळे देशात सर्वाधिक ऊसलागवड होते. देशात सर्वाधिक साखर कारखाने याच जिल्हय़ात आहेत. सांगोल्यासारख्या कायम दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी फळबागा उभारल्या. तेथील डाळिंब आज जगाच्या बाजारपेठेत जाते, ही गौरवाची बाबही त्यांनी बोलून दाखवली.

या वेळी आमदार गणपतराव देशमुख यांनी पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा मुक्तकंठाने गौरव केला. सोलापूर जिल्हय़ातील ऊस, साखर व फळबागांच्या विकासाचे संपूर्ण श्रेय शरद पवार यांनाच असल्याचे त्यांनी नमूूद केले. तर सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांसारखा मराठी मातीतला माणूस देशाचा राष्ट्रपती झाल्यास आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली. त्यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत समाजातील सर्व जातिजमातींना एकत्र घेऊन काम केले, याचाही उल्लेख शिंदे यांनी केला. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, १९७२ सालच्या दुष्काळप्रसंगी पवार हे सोलापूरचे पालकमंत्री होते, तर आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. त्या वेळी त्यांच्याकडून नेतृत्वगुण शिकायला मिळाले, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह पवार सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष आमदार दिलीप सोपल व स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार सिद्धाराम म्हेत्रे, निमंत्रक महेश गादेकर यांनीही मनोगत मांडले.