बातमीने डॉक्टर सुन्न
पुलगावच्या सैन्यदलाच्या दारूगोळा भांडारास लागलेली आग शमविण्याचे प्रयत्न करीत असताना आगीत मेजर मनोजकुमार निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी कामगिरी बजावताना शहीद झाले. सावंगीच्या मेघे अभिमत विद्यापीठाच्या रुग्णालयात निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी ते उपचारासाठी येणार होते. ते शहीद झाल्याच्या बातमीने डॉक्टर सुन्न झाले.
मनोजकुमार यांनी सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी उपचार घेतले होते. दुर्घटनेच्या दिवशी ते अखेरची तपासणी करण्यास येणार होते. भांडार परिसरात त्यांच्या सन्मानार्थ एका छोटेखानी सोहळयाचेही आयोजन करण्यात आले होते. इकडे रुग्णालयात याच दिवशी उपचाराची नोंद होती. मात्र, आगीमुळे दोन्ही कार्यक्रमांची विल्हेवाट लागली.
‘मनोजकुमार यांची रुग्णालयातील ही भेट शेवटची ठरेल, असे ध्यानीमनी नव्हते. परिसरातील गावकऱ्यांशी त्यांचे स्नेहाचे नाते होते. त्यांच्या अडचणी ते समजून घेत. अनेकांना तळमळत
ठेवत मनोजकुमार कायमचे निघून गेले,’ असे रुग्णालयातील डॉक्टरांनी नमूद केले.
सावंगीचे रुग्णालय जखमी जवानांच्या शुश्रुतेत आजही कार्यरत आहेत. पुलगाववरून पहाटेच रुग्णांना घेऊन सैन्यदलाचे वाहन सावंगीत पोहोचले. प्रशासकीय अधिकारी उदय मेघे व अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी रुग्णांची तपासणी केली. संबंधित विभागात रुग्णांना हलविण्यात आल्यानंतर तातडीने उपचार सुरू झाले. चौघांवर अतिदक्षता विभागात, तर इतरांवर जळीत विभाग, नेत्र, अस्थिरोग, शल्यक्रिया, मेंदू विभागात उपचार सुरू झाले. संस्थेची परीक्षा पाहणारा प्रसंग या दृष्टीने उपचार सुरू झाले. परिचारिका, वार्डबॉय, प्रयोगशाळा सहाय्यक क्षणभरही विश्रांती न घेत कार्यरत होते.
दुपारी सैन्यदलाच्या पुणे व कामठी रुग्णालयाचे डॉक्टर पोहोचले. संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी येथील डॉक्टरांचे आभार मानले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गरज पडल्यास हवाई रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे नमूद केले. एकही रुग्ण इतरत्र हलविण्याची गरज पडली नाही. विनामूल्य उपचार व रुग्णांसह त्यांच्या आप्तांना भोजनाची व्यवस्थाही देण्यात आली.

पहाटे दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत उपचारांवर देखरेख ठेवणारे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव म्हणाले की, आमची कसोटीची वेळ होती. परिचारिकांसह तीस जणांचा चमू गठित करण्यात आला होता. डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. महाकाळकर, डॉ.आर.के. शिंदे, डॉ. श्रध्दा जैन, डॉ. एस. देशपांडे, डॉ.पी. सुने यांचे प्रयत्न सार्थकी लागले. दुपारनंतर स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन करण्यात आला.