श्रीमंत खेमसावंत भोसले यांचे प्रतिपादन

आदरातिथ्य, संस्कृतीची जोपासना करीत आपल्या भूमीसाठी आणि नंतर आपल्या प्रगतीसाठी पर्यटन उद्योगात सामील व्हायला पाहिजे. फक्त पैसे कमविणार, अशी इच्छा ठेवून या उद्योगात दाखल झालेले प्रगती साधू शकत नाहीत, असे सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी सांगितले.

पर्यटनात स्वच्छता व पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. द्वारका कृष्ण पर्यटन विकास व सेवा सहकारी संस्थेच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात श्रीमंत खेमसावंत भोसले बोलत होते. या वेळी राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले, संस्थेचे अध्यक्ष डी. के. सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, रात्रीस खेळ चाले मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत, कलाकार प्रल्हाद कुडतरकर, सुधीर धुमे, पर्यावरणतज्ज्ञ प्रा. विजय फातरफेकर, मुख्यमंत्र्यांचे सेवानिवृत्त माहिती अधिकारी सतीश पाटणकर, सचिन अशोक देसाई, रेश्मा सावंत, माजी सरपंच आबा सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र फाटक, बागवे, अटल प्रतिष्ठानचे नकुल पार्सेकर, भाई देऊलकर, भरत गावडे आदी उपस्थित होते.

जगात पर्यटन आहे. त्यासाठी आदरातिथ्य, पायाभूत सुविधा सांस्कृतिक ठेवा, इतिहास, संस्कृती अशा सर्व अंगांनी पर्यटनाला गरज आहे. पर्यटनाची आवड असली तरच या उद्योगात यश मिळू शकते. भारतात प्रथम सन १९७२ मध्ये पर्यटनातून विकासाची संकल्पना आली ती गोवा राज्याने स्वीकारून प्रगती साधली. माझे वडील श्रीमंत शिवराम राजेंनीदेखील समुद्रकिनारी जागा देऊन पर्यटनाची बिजे रोवण्याचा प्रयत्न केला, असे श्रीमंत खेमसावंत भोसले म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पर्यटनाच्या सर्व संकल्पनांचा विकास झाला तर पर्यटनातून जिल्ह्य़ात आर्थिक क्रांती घडेल, असा विश्वासदेखील श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर होऊन वीस वर्षे झाली तरी खऱ्या अर्थाने विकास झालेला नाही. पर्यटनासाठी येणाऱ्या निधीचा कुठल्या कामावर खर्च होतो त्याचे ऑडिटदेखील व्हायला पाहिजे. डी. के. सावंतसारखे असंख्य पर्यटनात झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांचादेखील शासनाने आदर करायला हवा, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात रस्त्यावर पडलेले खड्डे जिल्ह्य़ाच्या पर्यटनाची बदनामी करणारे आहेत. त्यामुळे रस्त्यांचे ऑडिटदेखील व्हायला हवे. सावंतवाडी शहराचा पर्यटन विकास, रस्ते जिल्ह्य़ाला आदर्श ठरतील, असे काम आहे, असे नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले. या वेळी रात्रीस खेळ चाले मालिकेचे कलाकार पांडू अर्थातच प्रल्हाद कुडतरकर यांनी या मालिकेने पर्यटनात वाढ होत असून, मालिका चित्रित करणाऱ्या घराला दरदिवशी मे महिन्यात दोनशे लोक भेट देत होते, असे त्यांनी सांगितले. या वेळी रात्रीस खेळ चाले मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत, प्रल्हाद कुडतरकर (पांडू), रूपाली शिरसाट, आदींचा सत्कार करण्यात आला. या वेळी डी. के. सावंत म्हणाले, सिंधुदुर्गचा सर्वागीण पर्यटन विकास होत असताना शालेय मुलांना वाहतूक नियमनदेखील या दिनी महत्त्व सांगण्यात येत आहे.