सततचा दुष्काळ, तसेच पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वाढता अभाव यामुळे किडनी विकाराच्या रुग्णांच्या प्रमाणात सतत वाढ होत असून, मराठवाडय़ात किडनी विकाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे सरकारने या भागाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे किडनी विकारतज्ज्ञ डॉ. प्रमोद घुगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
मराठवाडय़ात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढते आहे. विंधनविहिरींच्या पाण्याची पातळी ५०० ते ६०० फूट खोल गेली आहे. पाण्यातील डीटीएसचे प्रमाण १०० ते २०० असेल तर ते पिण्यायोग्य असते. प्रत्यक्षात या भागातील टीडीएसचे प्रमाण १ हजार ते १४०० पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मुतखडय़ाच्या आजाराचे प्रमाण, लघवीतून जंतूसंसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे किडनीवर मोठा परिणाम करणारे आजार उद्भवत आहेत. जगभरात १ ते २ टक्के लोकांनाच किडनीचे आजार होत असतात. मराठवाडय़ात हा आकडा १० ते १२ टक्क्यांच्या आसपास आहे. लातूर शहरातील रुग्णाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे डॉ. घुगे म्हणाले.
किडनीचा आजार झाल्यानंतर अनेक ठिकाणी डायलिसीस करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक रुग्णालयांत किडनीचे तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही डायलिसीसचा वापर केला जातो. त्यामुळे रुग्णांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही असते. डॉ. घुगे हे लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी व बीदर या जिल्हय़ांतील एकमेव किडनी सुपर स्पेशालिस्ट आहेत. आपल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये आठ अद्ययावत डायलिसीस मशिन्स उपलब्ध आहेत. मुंबईनंतर उत्तम दर्जाची यंत्रसामुग्री आपल्याकडेच उपलब्ध असून डायलिसीसला लागणारे आरओ सिस्टीमचे दर्जेदार पाणी उपलब्ध आहे. कावीळ असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र मशीन सज्ज असून त्यामुळे इतर रुग्णांना जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी होते.
राज्य सरकारने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ८ ते १२ वेळा डायलिसीसची सुविधा उपलब्ध होते. एका वेळी डायलिसीसचा खर्च १ हजार २०० रुपये येतो. पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे हा खर्च आहे अन्यथा तो १ हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो, असेही घुगे यांनी सांगितले. किडनीच्या आजाराबाबत नागरिकांनी जागरूक असायला हवे. रक्तदाब, मधुमेह या आजारांच्या रुग्णांमध्ये किडनीच्या आजाराचा धोका अधिक संभवतो. किडनीच्या आजाराचे उपचार महागडे असल्यामुळे खर्च परवडत नाही, म्हणून किमान १५ ते २० टक्के रुग्णांना उपचार घेता येत नाहीत व त्यातूनच मृत्यू संभवतो. किडनीचे आजार व उपचार या संबंधी आता जागरुकतेची गरज असल्याचेही ते म्हणाले.

काय करायला हवे?
जेवण कमी जाणे, दम लागणे, लघवी कमी होणे, पायावर सूज येणे, शरीरातील रक्त कमी होणे हे किडनीच्या आजाराचे लक्षण आहे.
किडनीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे. दररोज दीड लिटर लघवी होईल इतके पाणी किमान प्यावयास हवे. शुद्ध पाण्याची अडचण असल्यामुळे प्रत्येकाने पाणी उकळून व गाळून पिलेच पाहिजे. या बाबत फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे किडनीचे आजार वाढतात. हा आजार सहसा लक्षात येत नाही.