बालनाटय़ संमेलनाध्यक्ष कांचन सोनटक्के यांचे मत
माझी नाटय़ उपचारपद्धती आणि कार्यप्रणाली मुलांबरोबर प्रत्यक्ष काम करता करतानाच आकाराला आली आणि घडत गेली. मुलं हेच माझे शिक्षक आणि प्रयोगशाळा आहे, असे प्रतिपादन पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाटय़ संमेलनाच्या अध्यक्ष कांचन सोनटक्के यांनी केले.
सोलापूर येथील ‘ह. दे प्रशाला शाळे’च्या प्रांगणात (डॉ ए.पी. जे अब्दुल कलाम रंगमंच) ‘बाळासाहेब ठाकरे नाटय़नगरी’त भरलेल्या या संमेलनाच्या शेवटच्या दिवशी निवेदिका उत्तरा मोने यांनी सोनटक्के यांची मुलाखत घेतली.

‘या कामाला सुरुवात केली तेव्हा मलाच माहीत नव्हते की, मी कोणत्या वाटेने जाणार आहे. मुलांनी माझ्या कामाला खरी दिशा दिली. माझ्या जीवनालाही त्यांनी अर्थ दिला,’ असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘एका नाटकासाठी मी कर्णबधिर व अंध मुलांना एकत्र केले होते. तालमीपूर्वी मी दोन अंध मुलींचे बोलणे ऐकले. एक मुलगी दुसऱ्या अंध मुलीला सांगत होती, हे किती चांगले आहे की, आपण किमान एकमेकांचे ऐकू तरी शकतो. या कर्णबधिर मुलींचे काय होत असेल? ही गोष्ट ऐकून माझी काम करण्याची उमेद वाढली.’
‘शाळांमध्ये ज्याप्रमाणे माध्यमिक आणि प्राथमिक विभागांतील शिक्षकांमध्ये फरक केला जातो त्याच दृष्टिकोनातून मोठय़ांचे नाटक करणारे आणि बालनाटय़ करणारे यांच्याकडे पहिले जाते,’ अशी खंत कांचनताई व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘बालनाटय़विषयक उपक्रमांची संख्या, व्याप्ती, आवाका व दर्जा उंचावला पाहिजे. त्यासाठी शाळेत नाटय़प्रयोग व्हायला हवे. नाटय़शिक्षक असायला हवे. बालनाटकांच्या सरावासाठी सभागृह उपलब्ध व्हावे.
तांत्रिक गोष्टींवर अवलंबून न राहता सतत प्रयोग व्हायला हवे. दहा वर्षांपूर्वीच्या कथा दाखवण्यापेक्षा मुलांना सध्याच्या समकालीन विषयांकडे वळवले पाहिजे’.

‘बालरंगभूमीमुळे चांगले दिवस येतील’
व्यावसायिक रंगभूमीला बरे दिवस नाहीत, असे बोलले जाते. मात्र बालरंगभूमीमुळेच व्यवसायिक रंगभूमीची मरगळ दूर होऊन चांगले दिवस येतील असा विश्वास ९६ व्या नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केला. बालनाटय़ संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्या वेळी गवाणकर बोलत होते. किलबिलसाठी एक तासाचा कालावधी मिळावा यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.