‘नमामि चंद्रभागा’ योजनेअंतर्गत श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी बंधूच्या सोयीसाठी प्रशस्त असे प्रेक्षणीय नामसंकीर्तन सभागृह उभारण्यात येणार आहे. कलात्मकरीत्या तयार करण्यात येणाऱ्या या नियोजित सभागृहाच्या संकल्पचित्राचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

‘नमामि चंद्रभागा’ योजना राज्य सरकारने हाती घेतली असून या योजनेअंतर्गत चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण व विकास केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथे वारकऱ्यांकरिता भव्य-दिव्य नामसंकीर्तन सभागृह तयार करण्यात येणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नामसंकीर्तन सभागृहाचे संकल्पचित्र अगोरा डिझायनर्सचे आíकटेक्चर अविनाश हावळ यांनी सादर केले. हे सभागृह अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त तसेच या नामसंकीर्तन सभागृहामध्ये सुमारे १२०० ते १५०० जणांची बठक क्षमता असणार आहे. तसेच विठुरायाचे भक्त असणाऱ्या सर्व साधू संतांचे माहात्म्य या ठिकाणी दर्शविण्यात येणार आहे.

पंढरीच्या आध्यात्मिक वातावरणास शोभेल अशी या सभागृहाची वास्तुरचना असणार असून, यामध्ये प्रकाश व्यवस्था, भव्य स्टेज, अल्ट्रा साऊंडसिस्टीम याचा समावेश आहे, वयोवृद्धासाठी लिफ्टची व्यवस्था, वाहन व्यवस्था यांसह अनेक अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पंढरीचे माहात्म्य दर्शविणाऱ्या यात्रा कालावधीतील विविध संतांच्या पालखी सोहळ्यासह, रिंगण सोहळा, दिंडी, संतचरित्र्य, साहित्य हे प्रसिद्ध चित्रकारामार्फत रेखाटण्याचे नियोजन आहे. या प्रेक्षणीय सभागृहाचे श्रद्धेचा भाव निर्माण होईल अशी वातावरण निर्मिती आहे. वास्तुरचना करताना चंद्रभागा नदीवरील घाट, पायऱ्या काळ्या पाषाणाच्या असे नियोजन आहे. येथील आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या समोरील नगरपालिकेच्या जागेमध्ये या संकीर्तन सभागृहाची उभारणी करण्याचे नियोजन असून हे वारकरी भाविकांसाठी प्रेक्षणीय ठरणार आहे.