चार दिवसापूर्वी साखर परिषद भरवून मुख्यमंत्री व राज्य शासनावर टीकेची झोड उठविणारे खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्री व महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या तुकडय़ासाठी मुख्यमंत्र्यांसमोर गुडघे टेकवले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे, अशी टीका करून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनात उडी घेत असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत घोषित केले.
राज्य साखर संघाने साखर उद्योगातील अडचणींविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रावर खासदार शेट्टी यांनी टीका करताना शरद पवार यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर शेट्टी यांनी सांगली येथे साखर परिषदेचे आयोजन केले होते. सांगलीत झालेल्या साखर परिषदेत शेट्टी व खोत यांनी राज्य शासनावर टीका करताना जहाल भाषा वापरली होती. राज्य सरकारची मस्ती उतरवू, हिसका दाखवू, बारामतीकरांना मोडले आता तुम्हाला मोडू, अच्छे दिन नव्हे बुरे दिन आले आहेत अशा शब्दांत केंद्र व राज्य शासनाचा समाचार घेतला होता. हा संदर्भ देऊन मुश्रीफ म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात आक्रमक भाषेचा वापर करणारे शेट्टी व खोत यांचे वागणे लगेचच बदलले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी राज्यमंत्री व महामंडळ मिळण्याबाबत चर्चा करताना आक्रमकतेला मुरड घालून चक्क गुडघे टेकले आहेत. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चच्रेवेळी शेट्टी यांना ऊस उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विसर पडला. महिन्याभरापूर्वी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीतील साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. अद्यापही हे पसे ना साखर कारखान्यांना मिळाले ना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना. शेतकरी अडचणीत आला असतानाही राजू शेट्टी आता तोंड उघडण्यास तयार नाहीत. त्यांचे हे वागणे बरे नव्हे अशा शब्दांत मुश्रीफ यांनी शेट्टींना चिमटा काढला.
राज्य शासनाने घोषित केलेले दोन हजार कोटी रुपये मिळाले नसल्याने आणि शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ऊस उत्पादकांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे. येत्या दोन दिवसात सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यासह उग्र स्वरू पाचे आंदोलन करण्यात येईल असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपद निवडीची बठक लवकरच होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडीक, विनय कोरे, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, संजय मंडलिक यांच्याशी चर्चा करून पदाधिकारी निवडले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांची विमा योजना राबविणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा व पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना जाहीर केली आहे. ही योजना मोदींची नसून केंद्र शासनाची आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादीचे आमदार असलो तरी ही योजना आपल्या कागल मतदारसंघात सक्षमपणे राबविणार आहोत. दारिद्रय़रेषेखालील, विधवा, परित्यक्ता, दलित व भटक्या विमुक्त लाभार्थीना योजनेचा लाभ आपल्याला मिळणाऱ्या आमदार मानधनातून भागवणार आहोत, असे सांगून मुश्रीफ यांनी अन्य लोकप्रतिनिधींनी ही योजना राबवून त्याचा वंचितांना लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.