नियामक मंडळाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न बेकायदा असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. येत्या तीन दिवसांत निर्णय घेतला नाही तर, नियामक मंडळ उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नियामक मंडळाचे सदस्य रवींद्र पुरोहित यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी स्थानिक समितीचे सदस्य सुरेश पाटील हेही उपस्थित होते.
वालचंद महाविद्यालयाचे संचालक तथा प्राचार्य गजानन परिशवाड यांना बेकायदा निलंबित करण्यात आले असून, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने बळजबरीने महाविद्यालयाचा ताबा घेतला आहे. यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण प्रदूषित झाले आहे. याबाबत नियामक मंडळ आणि एज्युकेशन सोसायटी यांच्यातील वाद वेगवेगळ्या पातळीवर प्रलंबित आहे. सार्वजनिक न्यासने नवीन पदाधिकारी बदलाला अद्याप मान्यताच दिली नसल्याने आणि संस्था व महाविद्यालय यांच्यात झालेल्या कराराचे पालन करण्याचा मुद्दाच येत नाही असे स्पष्ट करून पुरोहित यांनी सांगितले की, हिशोब सोसायटीला देणे बंधनकारक नाही. मात्र, महाविद्यालय शासकीय अनुदानित असल्याने वेळोवेळी शासनाला हिशोब सादर करण्यात आला असून गरकारभाराचा आरोप चुकीचा आहे. या आरोपाद्बारे संचालक तथा प्राचार्य परिशवाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदा ठरते. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न श्रीराम कानिटकर आणि सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे करीत आहेत. महाविद्यालयाच्या परिसरातमध्ये घुसून कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नियामक मंडळाने उच्च न्यायालयात दाद मागितली असता पोलीस संरक्षणाचे आदेश दिले आहेत.