सर्व खासदारांना दिल्लीतच राहण्याचे आदेश
सांसदीय अधिवेशन काळात अनेक खासदार अनुपस्थित होते. मात्र आता काही महत्त्वाची विधेयक मंजूर करण्याच्या दृष्टीने या अधिवेशन काळात पक्षाच्या एकाही खासदाराने दिल्ली सोडून जाऊ नये, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यामुळे कोल्हापूरला ४ ते ६ मे दरम्यान होणारी राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते रामलाल, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि व्ही. सतीश उद्या सकाळी नागपुरात येत आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धामुळे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची ही होणारी बैठक रद्द करण्यात आली असून ती आता २२ ते २४ मे दरम्यान होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या बैठकीबाबत मधल्या काळात ही माहिती दिली होती. कोल्हापूरच्या बैठकीला राज्यातील सर्व खासदार, आमदारांसह केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार होते.
मात्र, या अधिवेशन काळात दिल्ली सोडून कुठल्याही खासदाराने जाऊ नये, असा आदेश दिल्याने ही बैठकच रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात भाजपचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षाचे ज्येष्ठ नेते रवींद्र भुसारी यांच्याकडे लग्न असल्यामुळे हे ज्येष्ठ नेते नागपुरात येणार असून लग्न समारंभ आटोपून ते दिल्लीला रवाना होतील.