कोल्हापूर शहराच्या महापौर तृप्ती माळवी शनिवारी लाचखोरीच्या प्रकरणात पोलिसांकडून अटक होण्याच्या पार्श्वभूमीवर आजारी असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र, अटकेच्या भीतीपायीच माळवी यांनी आजारीपणाचे सोंग घेतल्याची चर्चा कोल्हापूरमध्ये रंगली आहे. त्या सध्या कोल्हापूरच्या राजरामपुरीतील मोरया रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तृप्ती माळवी यांना त्वरित अटक केली जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी आफळे यांनी दिली. महापौर तृप्ती माळवी आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाविरुद्ध शुक्रवारी लाच घेतल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज, शनिवारी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यापूर्वीच तृप्ती माळवी आजारी असल्याचे सांगत रूग्णालयात दाखल झाल्या. संतोष हिंदुराव पाटील यांनी माळवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पाटील यांच्या भूखंडावर महापालिकेचे आरक्षण आहे. हे आरक्षण उठविण्यासाठी पाटील यांच्याकडे महापौरांनी ४० हजार रूपयांची लाच मागितली होती.