लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांनी आज आपला राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून त्या उद्या महापालिका आय़ुक्तांकडे महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत.
जमिनीवरील महापालिकेचे आरक्षण उठविण्यासाठी शुक्रवारी रात्री महापौर माळवी यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी स्वीय सहायक मामेभाऊ अश्विन गडकरी याने १६ हजार रुपयांची लाच महापालिकेत स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याबद्दल त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक गडकरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी गडकरी याला अटक करण्यात आली. मात्र महिलांना रात्री अटक करता येत नसल्याच्या कारणावरून माळवी यांना घरी जाण्यास सशर्त परवानगी देण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर रात्री महापौर माळवी या निवासस्थानी परतल्या. तथापि नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र दवाखान्यातून सोडल्यानंतर लगेचच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.