स्मार्ट सिटी अभियानमध्ये समावेश होण्यासाठी कोल्हापूर शहर बहुतांश निकषांस पात्र आहे. स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश होण्यासाठी एक चांगला प्रस्ताव तयार करून त्याचे सादरीकरणही करण्यासाठी चांगल्या कंपनीच्या प्रतिनिधींची मदत घ्यावी. शहरामध्ये कामे झाली असून त्याचे सादरीकरण करताना कमी पडू नका, अशा सूचना माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केली.
केंद्र शासनामार्फत लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी, स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक शहरे तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानांची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये स्मार्ट सिटी योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाकडून कळविण्यात आलेल्या राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अभियानात शहरातून स्पर्धात्मक पद्धतीने शहरांची निवड करून या शहरांची शिफारस केंद्र शासनाकडे केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्य शासनामार्फत निवड करण्यात आलेल्या शहरांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करून तो केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या आंतरराज्यीय स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये सादर करणे अपेक्षित आहे. अभियानाची राज्यात सुरुवात होण्यापूर्वी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरून काही बाबींची पूर्वतयारी करणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या परिशिष्ट तीनच्या फॉर्म क्रमांक दोनमधील विहित स्कोअर कार्डमधील माहिती भरून सदर माहिती आपल्या स्तरावर १० जुलपूर्वी तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले की, स्मार्ट सिटीसाठी अटी व नियमांमध्ये बसणाऱ्या पहिल्या दहा शहरांची मेरिटवर निवड होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून त्यासाठीची तयारी सुरू असून १० जुलपूर्वी सर्व माहिती राज्य शासनाकडे दिली जाणार आहे.