रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत गेल्या अनेक वर्षांपासून भासत असलेली वैद्यकीय महाविद्यालयाची उणीव भरून काढत डेरवण येथे उभारण्यात आलेल्या भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर ग्रामीण रुग्णालयाचा शुभारंभ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परिषदेचे प्र-कुलगुरू शेखर राजदेरकर यांच्या हस्ते झाला.
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी उत्कृष्ट सुविधा निर्माण करण्यात आलेल्या या महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. राजदेरकर यांनी, चांगले शिक्षण घेऊन भावी पिढी घडवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त विकास वालावलकर, वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुवर्णा पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रफुल्ल गोडबोले इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
डेरवण येथील सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त रुग्णालयाचा लाभ कोकणवासीयांनी गेल्या सुमारे दोन दशकांहून जास्त काळ घेतला आहे. परिचारिका आणि अर्धवैद्यकीय विषयांवरील अभ्यासक्रमही येथे चालवले जातात. त्याचबरोबर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती व प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. पाटील व प्रशासकीय अधिकारी गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचारी प्रयत्नशील असतात. मुंबई-पुण्याच्या नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांची शिबिरेही येथे नियमितपणे आयोजित केली जातात. नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे या वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
यंदा पहिल्याच वर्षी महाविद्यालयात एकूण शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून एमएचसीईटी परीक्षेत १६५ हून जास्त गुण मिळवलेल्या ८५ विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. उर्वरित १५ जागा अनिवासी भारतीयांसाठी आहेत. प्राचार्य डॉ. आर. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयात २६ विभाग असून १०७ प्राध्यापक वैद्यकीय विषयांचे अध्यापन करणार आहेत. पाचशे खाटांनी युक्त रुग्णालय अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, सुसज्ज प्रयोगशाळा, वसतिगृह इत्यादी सुविधाही दर्जेदार पद्धतीने उपलब्ध आहेत. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व वैद्यकीय अनुभवासाठी चिपळूण तालुक्यातील वहाळ, फुरूस आणि खरवते या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली असून प्रत्येक केंद्रातील सहा खाटा पाच वर्षांच्या मुदतीने महाविद्यालयाशी संलग्न राहणार आहेत.