नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारी ३० जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. संतोष गोरख भवाळ (३०, कोपर्डी) आणि नितीन गोपीनाथ भैलुमे (२६, कोपर्डी) यांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय न्यायालायने दिला.
संतोष भवाळ याला १६ तर नितीन भैलुमे याला १७ जुलैला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्य़ाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला असून, आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपर्डीला भेट देऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. या प्रकरणातील नराधमांना फाशी होईपर्यंत सरकार त्याचा पाठपुरावा करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी पीडित कुटुंबीयांना दिली. गुन्ह्याच्या तपासकामावर मी स्वतः लक्ष ठेवेन, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या खटल्यामध्ये सरकारी बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून, हा खटलाही जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार आहे. महिन्याभरात या प्रकरणी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.