पीडित मुलीच्या आईचे मुख्यमंत्र्यांना साकडे

माझी निर्भया गेली, त्या नराधमांनी हाल हाल करून माझ्या लेकराचा बळी घेतला आहे त्यांना फाशी झाली पाहिजे. दिल्लीनंतर  पुन्हा  दुसरी निर्भया गेली आहे आता तिसरी निर्भया जावू नये यासाठी काळजी घ्या असे साकडे पीडित मुलीच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांची कोपर्डी येथे भेट घेतली असता मुलीच्या मातेने केलेले आर्त आवाहन मुख्यमंत्र्यांना हेलावून टाकणारे होते

मुख्यमंत्री सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी मोटारने कोपर्डी येथे आले  त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदयास हात पीडित कुटुंबाला भेटण्यापूर्वीच हात जोडून विनम्र अभिवादन केले व नंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या छोटयाशा पत्र्याच्या खोलीमध्ये ते सांत्वन करण्यासाठी आत गेले त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रा. राम िशदे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, पोलीस पाटील समीर जगताप व माजीमंत्री बबनराव पाचपुते होते.

यावेळी मुख्यमंत्री घरात गेल्यावर पीडित मुलीच्या आईने  अश्रूंना पुन्हा एकदा मोकळी वाट करून दिली. तिचे हुंदके थांबत नव्हते यावेळी कुटुंबीयांनी त्या मातेला सावरले. यानंतर घडलेला सर्व घटना क्रम मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला. यावेळी तिची आई म्हणाली की,  माझी निर्भया गेली , त्या नराधमानी हाल हाल करून माझा लेकराचा बळी घेतला आहे त्यांना फाशी झाली पाहिजे व दिल्ली नंतर पुन्हा माझी दुसरी निर्भया गेली आहे आता तिसरी निर्भया जावू नये यासाठी काळजी घ्या.

यावर पीडित मुलीच्या बहिणीने अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी शालेय पातळी पासून मुलींना स्वसंरक्षणाचे शिक्षण देण्यात यावे अभ्यासक्रमात याचा समावेश करावा असे मुख्यमंत्र्यांना सांगितले

पीडितेचे नातेवाईक लालासाहेब सुद्रिक यावेळी म्हणाले की,   ग्रामीण भागामध्ये व आमच्या गावामध्ये खोटया अ‍ॅट्रॉसिटीच्या घटना घडत आहेत यामुळे आरोपींचे धाडस वाढते व दलितेतर नागरिकात यामुळे दहशत आहे तेव्हा या कायद्याचा फेरविचार करण्यात यावा.आजही आमच्या मुली शाळेमध्ये जाण्यास घाबरत आहेत हे  यामागचे कारण आहे तसेच साक्षीदारांना खटल्याचा निकाल लागे पर्यत पोलीस सरंक्षण मिळावे व आरोपींची नार्को चाचणी करण्यात यावी.

यावर देवेन्द्र फडणवीस यांनी सरकार तुमच्या बरोबर आहे त्यामुळे कोणीही घाबरू नये, आपल्या जेवढया सूचना आल्या आहेत त्याचा विचार करू काही  खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल , हा खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकम यांचे सोबत चर्चा झाली आहे. आरोपीना फाशीची शिक्षा होईपर्यत आम्ही थांबणार नाहीत. पालकमंत्री राम िशदे हे देखील रोज लक्ष देत आहे मी पण रोज पोलिसांकडून याबाबत माहिती घेत आहे. या नंतर बाहेर आल्यावर मुख्यमंत्री यांनी गावकऱ्यांचे त्यांनी दाखवलेल्या संयमासाठी कौतुक केले. यावेळी राजेश परकाळे व संजीव भोर यांनी देखील काही सूचना मांडल्या.