गडचिरोली जिल्ह्य़ात काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेला जहाल नक्षलवादी कृष्णा ठाकूर हा सहा वर्षांपूर्वीपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थी होता. देशभक्ती युवा मंचाच्या माध्यमातून या चळवळीत दाखल झालेल्या या तरुणाच्या मृत्यूने चंद्रपूर जिल्ह्णातील राजुरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्य़ात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. या दोघांकडून दोन बंदुकासुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खोब्रामेंढा गावाजवळच्या जंगलात झालेल्या या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही नक्षलवाद्यांची ओळख आता पटली असून त्यापैकी एक चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा शहरातील युवक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृष्णा उर्फ राजा ठाकूर असे नाव असलेला हा नक्षलवादी २००८ मध्ये चळवळीत सहभागी झाला असे पोलिसांचे म्हणणे आहे. गडचिरोलीतल्या चकमकीत चंद्रपूर जिल्ह्णाातील युवक ठार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजुरा शहरात इंदिरानगर परिसरात राहणारा कृष्णा ठाकूर तेथील शिवाजी महाविद्यालयात बी.ए.च्या द्वितीय वर्षांला शिकत असताना तो देशभक्ती युवा मंच या संघटनेच्या संपर्कात आला. ही संघटना नक्षलवाद्यांची समर्थक संघटना म्हणून २००६ पासून चंद्रपूर जिल्ह्य़ात सक्रिय होती. महाविद्यालयीन तरुणांना जाळयात ओढून त्यांना नक्षलवादी चळवळीत नेण्याचे काम या संघटनेकडून होत होते. या संघटनेचा प्रमुख अरुण भेलके व त्याचा साथीदार मनोज सोनुले हे दोघेही उच्च शिक्षित आहेत. २००७ मध्ये चंद्रपूर पोलिसांनी या संघटनेच्या सदस्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर भेलके व सोनुले फरार झाले. त्यांच्यासोबत काही युवक सुद्धा फरार झाले होते. त्यापैकी एक कृष्णा होता, असे पोलिसांनी आज सांगितले. भेलके व सोनुले हे दोघेही चळवळीत सक्रिय असून सध्या जंगलात आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कालच्या चकमकीत ठार झालेल्या कृष्णाचे वडील राजुऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागात चालक म्हणून नोकरीला होते. कृष्णाचा एक भाऊ आजही चालकाचा व्यवसाय करतो. कृष्णा ठार झाल्याचे या कुटुंबाला काल सायंकाळी पोलिसांकडून कळले. आज त्याचे आईवडील दोघेही गडचिरोलीला पोहोचले. या दोघांचा जबाब पोलिसांनी आज नोंदवून घेतला.
देशभक्ती युवा मंचमध्ये सक्रिय असलेला कृष्णा २००८ मध्ये अचानक बेपत्ता झाला. तेव्हापासून त्याची खबरबात नव्हती. कृष्णा शिक्षणात हुशार होता. मात्र, मित्रांनी त्याचा घात केला असे त्याचे वडील बी.डी. ठाकूर यांनी सांगितले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अचानक नक्षलवादी झालेल्या या तरुणाच्या मृत्युमुळे राजुरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या परिसरातील आणखी काही तरुण चळवळीत सक्रिय आहेत. ते देखील देशभक्ती युवा मंचचे सदस्य होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.