सोलापुरातील जुनी मिलच्या जमिनीवर प्लॉट खरेदी करून देतो असे सांगून विविध कारणांसाठी सभासदांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली व प्लॉट न देता सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर कुमार शंकर करजगी यांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.  करजगी हे सोलापुरातील मोठे प्रस्थ समजले जातात. ५५ वर्षांपूर्वी बंद पडलेली सोलापूर स्पिनिंग ऑन्ड व्हिव्हिंग मिल अर्थात जुनी गिरणी ही संपूर्ण आशिया खंडात मोठी कापड गिरणी होती. तब्बल २२ हजार कामगार या कापड गिरणीत काम करीत होते. १९६३ साली ही कापड गिरणी बंद पडली.

मुंबईतील तत्कालीन ज्येष्ठ उद्योगपती नरोत्तम मोरारका यांच्या मालकीच्या जुनी कापड गिरणीची जागा १३६ एकर आहे. प्रत्यक्ष जुनी कापड गिरणी ज्या ठिकाणी होती, तेथे ६५ एकर जमीन आहे. बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारसह इतर निम-सरकारी संस्थांची देणी या जुन्या कापड गिरणीवर होती. ही देणी वसूल होण्यासाठी देणेकऱ्यांनी उच्च न्यायालयात दावाही दाखल केला होता. त्यानुसार उच्च न्यायालयाने गिरणीची संपूर्ण मालमत्ता विकून सर्व देणी अदा करण्यासाठी ‘तडजोड हुकूमनामा’ मंजूर केला होता. त्यासाठी कोर्ट रिसीव्हरची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार कोर्ट रिसीव्हरने कार्यवाही सुरू असताना १९८८ साली कापड गिरणीची सर्व जमीन लिलावाद्वारे विक्रीस काढली. त्यावेळी कुमार शंकर करजगी (वय ६८, त्यावेळी रा. जुनी मिल कामगार चाळ, सध्या रा. सोनाशंकर निवास, बाळे, सोलापूर) यांनी जुनी मिल बेकार कामगार संघर्ष समिती गठीतकरून गिरणीच्या बेकार कामगार व वारसदारांना त्यांच्या हक्काची देणी अदा व्हावी म्हणून आंदोलन हाती घेतले होते.

दरम्यान, जुनी मिलच्या संपूर्ण जमिनीचा लिलाव पुकारला गेला तेव्हा करजगी यांनी जुनी मिल बेकार कामगार व वारसदार संघर्ष व जनहित दक्षता समितीच्या माध्यमातून जमीन लिलावात भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तेथील जागा अवघ्या २० रुपये प्रति चौरस मीटर अशा नाममात्र दराने खरेदी देण्यात येईल, अशी योजना पुढे करीत त्यासाठी सभासद मिळविले. ३८५ सभासदांनी प्रत्येकी एक हजार चौरस फूट भूखंडसाठी प्रत्येकी २० हजार रुपयेप्रमाणे एकूण दोन कोटी ५३ लाखांची रक्कम करजगी यांच्या सांगण्यावरून युको बंकेत संघर्ष समतिच्या खात्यावर जमा केली.

दरम्यान, उच्च न्यायालयात जुनी मिलच्या संपूर्ण जमिनीच्या लिलावाची बोली मंजूर झाल्यानंतर संघर्ष समितीने पुढे लिलावात बोलीची रक्कम वाढल्याचे कारण पुढे करून करजगी यांनी प्रत्येक सभासदाकडून आणखी जादा दहा हजारांची रक्कम घेतली. त्याचवेळी करजगी यांनी आपला मुलगा नागेश करजगी यांच्या नावावर के. के. असोसिएट्स या नावाने संस्था स्थापन करून त्याद्वारे जुनी मिलच्या जागा परिसराचा विकास व घरे बांधून देण्याबाबत सक्ती केली. त्यातून पुन्हा प्रत्येकी २५ हजारांची रक्कम करजगी यांनी प्रत्येक सभासदाकडून उकळली. त्यानंतरही त्यांनी प्रत्यक्ष भूखंडाचा ताबा सभासदांना आजतागायत दिला नाही. तसेच भूखंडाचे खरेदीखतही करून दिले नाही. यात फसवणूक व विश्वासघात झाल्याचे दिसून येताच सर्व पीडित सभासदांनी एकत्र येऊन आंदोलन केले. पोलीस व शासनाकडे दाद मागितली. परंतु त्यांची दखल घेतली जात नव्हती.

तथापि, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याकडे काही सभासदांनी याबाबत तक्रारी दाखल केल्या असता त्यावर चौकशी झाली. यात अजितकुमार नागेश देशपांडे (वय ६४, रा. दक्षिण कसबा, सोलापूर) यांची फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कुमार करजगी यांच्या विरोधात फसवणूक व विश्वासघात करणे, खेटे कागदपत्रे तयार करणे व त्याचा उपयोग करणे आदी आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त शर्मिला घारगे-वालावलकर करीत आहेत.