गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर झालेली अमरावती-पुणे ही एक्स्प्रेस प्रत्यक्ष रुळावर धावण्याचा मुहूर्त यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधी साधला जाईल की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली असून या एक्स्प्रेसच्या मार्गात ‘कुंभमेळ्या’चे विघ्न आल्याचे सांगितले जात असले, तरी ही रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी रेल्वे मंडळाकडून आणि मुख्यालयाकडून अजूनही हिरवा कंदील न मिळाल्याने या गाडीचे घोडे अडल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी २०१२-१३ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना ७५ नवीन एक्सप्रेस गाडय़ा सुरू करण्याची घोषणा केली होती, त्यातील २२ रेल्वेगाडय़ा महाराष्ट्राच्या वाटय़ाला आल्या होत्या. बहुतांश रेल्वेगाडय़ा धावू लागल्या असताना बहुप्रतीक्षित अमरावती-पुणे एक्स्प्रेसला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. राज्यात अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुरू झाल्या आहेत. पण, प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असूनही ही एक्सप्रेस अडली आहे.अमरावती ते पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. सध्या या प्रवासासाठी सहा एक्स्प्रेस उपलब्ध असल्या, तरी या गाडय़ांचे आरक्षण मिळवणे जिकिरीचे काम होऊन बसले आहे. बुकिंग खुले होताक्षणीच आरक्षण ‘फुल्ल’ होताना दिसत असूनही रेल्वे प्रशासनाने मात्र ही गाडी सुरू करण्यास दिरंगाई चालवली आहे. मुळात रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली ही एक्स्प्रेस अकोला, पुर्णा, लातूरमार्गे धावणार आहे. तीही आठवडय़ातून केवळ दोन दिवस. मनमाड, दौंडमार्गे पुण्याचा प्रवास ७२५ किलोमीटरचा आहे, पण लातूरमार्गे या एक्स्प्रेसला तब्बल १ हजार ४० किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार आहे. या गाडीचा फेरा हा ३१५ किलोमीटरचा आहे. फेऱ्याने जाताना बारा तासांच्या प्रवासासाठी १९ तासांचा वेळ खर्ची पडणार आहे.
पश्चिम विदर्भातून पुणे येथे जाणाऱ्या बहुतांश प्रवाशांना खाजगी प्रवासी बसगाडय़ांचाच वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ‘हंगामा’च्या वेळी प्रवाशांची प्रचंड प्रमाणात लूट केली जाते, त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. अशा स्थितीत अमरावती- पुणे एक्स्प्रेस गाडी सुरू होण्यास लागत असलेला विलंब रोषाचा विषय बनला आहे.अलाहाबाद येथील कुंभमेळ्यासाठी जादा रेल्वेगाडय़ा पाठवण्यात आल्याने ही गाडी सुरू होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे, पण अजूनही रेल्वे मंडळाने आणि मध्य रेल्वे मुख्यालयाने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे ही गाडी केव्हा सुरू होणार याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे.
अमरावती-पुणे एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात रेल्वे मंडळाकडून किंवा मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून अजूनपर्यंत कोणतीही सूचना मिळालेली नाही. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ही एक्स्प्रेस मंजूर झाली आहे. गाडी सुरू करण्याविषयी परवानगी देण्याचे अधिकार मुख्यालयाला आहेत. तेथून सूचना मिळताच गाडी सुरू करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नरेंद्र बोरीकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. अमरावती-पुणे एक्स्प्रेस ही फेऱ्याची असली, तरी प्रवाशांची सोय होऊ शकेल. मराठवाडय़ात जाण्यासाठीही ही गाडी सोयीची आहे. सध्या पुणे येथे जाण्यासाठी गाडय़ांची संख्या अपुरी आहे. सध्या दररोज धावणारी भुसावळ-पुणे (कल्याणमार्गे) ही एक्स्प्रेस अमरावतीपर्यंत वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. या गाडय़ा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी आमची मागणी असल्याचे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुनील भालेराव यांनी सांगितले.