*  सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह * कैद्याकडून गळा चिरून खून

कुश कटारिया या आठ वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या आयुष पुगलियाचा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने डोक्यात सिमेंट फरशी आणि गळा चिरून खून केला. ही घटना सोमवारी सकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास घडली. या घटनेने पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्र चिन्ह निर्माण केले.

११ ऑक्टोबर २०११ ला आयुष पुगलियाने त्याच्या घराशेजारी राहणारे सुरुची मसाला कंपनीचे संचालक प्रशांत कटारिया यांच्या आठ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केली होती. या प्रकरणात   ४ एप्रिल २०१३ ला सत्र न्यायालयाने त्याला अपहरण व खुनाच्या कलमांखाली तीस-तीस वर्षांची अशी दमुहेरी जन्मठेप ठोठावली होती. उच्च न्यायालयानेही त्याला तिहेरी जन्मठेप ठोठावली होती व यावर सर्वोच्च न्यायालयानेही ११ मार्च २०१५ ला शिक्षामोर्तब केले होते. मध्यवर्ती कारागृहातील ५ क्रमांकाच्या बराकीत त्याला ठेवण्यात आले होते. यात एकूण १५० वर कैदी आहेत. काही दिवसांपूर्वी आयुषचा जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सूरज विशेषराव कोटनाके (२४) रा. गडचांदूर, चंद्रपूर याच्यासोबत वर्चस्वावरुन वाद झाला होता. सोमवारी सकाळी ६.३० वाजता चहापानाकरिता सर्व कैदी बराकीबाहेर निघाले. त्यावेळी आयुष बराकीसमोरच्या शौचालयाकडे जात होता, तर सूरज हा परत येत होता. त्यावेळी दोघांची बाचाबाची झालीे. आयुष हा शौचालयात बसला असताना सूरजने पाण्याच्या टाकीजवळील सिमेंटचा पत्रा डोक्यात घातला. त्यानंतर धारदार दांडय़ाने त्याचा गळा चिरला. त्याची स्वशननलिका कापली गेल्याने रक्ताच्या थारोळयात आयुष पडला व जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सूरजने स्वत:चे कपडे बदलले व आपण काहीच केले नसल्याचे भासवू लागला. परंतु काही कैद्यांनी त्याला बघितले होते. त्यानंतर आयुषला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.