गुजरातचे ज्येष्ठ साहित्यिक सीतांशू यशश्चंद्र यांना येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी दिली.
या पुरस्काराचे यंदाचे हे चौथे वर्ष. रूपये एक लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यशश्चंद्र यांचे ओडिसीएसू हलेसू, जटायू, वखार आणि मोहनेजोदाडो हे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. यशश्चंद्र यांनी प्रायोगिक आधुनिकतावादाची भूमिका स्वीकारून गुजराती कवितेला नवे परिमाण मिळवून दिले आहे. उपरोधिक, तल्लख लेखणीचा शिडकावा असलेली यशश्चंद्र यांची शैली गुजरातेत सर्वश्रृत आहे. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, लोकवाड:मय गृह प्रकाशनचे संपादक सतीश काळसेकर, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे यांचा समावेश असलेल्या निवड समितीने यशश्चंद्र यांची निवड केली. या आधी कन्नड भाषेतील कवी जयंत कैकीनी, हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत देवताले, मल्याळी साहित्यिक डॉ. के. सच्चिदानंदन् या साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नऊ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता निमंत्रित कविंचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात वसंत डहाके, सतीश काळसेकर, प्रा. दिलीप धोंडगे, ऐश्वर्य पाटेकर, विलास पगार, प्रशांत केंदळे हे सहभागी होणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ‘समकालीन गुजराती कविता’ आणि ‘समकालीन मराठी कविता’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी चंद्रशेखर जहागिरदार हे राहतील. गुजराती साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक सुषमा करोगल, मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक वसंत पाटणकर आणि रणधीर शिंदे यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख शाम पाडेकर यांनी केले आहे.