गणेशोत्सव आता अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणारी गणेशमूर्ती कारखान्यांची संख्या आणि कुशल कारागीर कमतरता यामुळे गणेशमूर्ती बनवण्यासाठी कारखानदारांना मोठी कसरत करावी लागत आहे. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागात मोठय़ा प्रमाणात पसरण्यास सुरुवात झाली आहे. हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की या परिसरातही गणेशमूर्ती बनवणारे लहान-मोठे कारखाने सुरू झाले आहेत. या सुमारे ४५० कारखान्यांमधून दरवर्षी जवळपास ३० ते ३५ लाख गणेशमूर्ती बनवल्या जात असून, यातून जवळपास ४० ते ४५ कोटींची आíथक उलाढाल होते आहे, त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तीना ग्लोबल स्वरूप प्राप्त झाले आहे. या मूर्तीना केवळ राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून मागणी होण्यास सुरुवात झाली.
पेण शहरात असलेल्या कारखान्यांमधून काम करणाऱ्या कामगारांनी गणेशमूर्ती बनविण्याची कला शिकल्यावर स्वतचे कारखाने सुरू केले. तसेच आसपाच्या गावांमधून राहणारे कामगार जवळच्याच गावात किंवा स्वतच्याच गावात काम मिळत असल्यामुळे पेणमध्ये काम करण्यासाठी येत नाहीत. परिणामी पेण शहरातील गणपती कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या कुशल कामगारांची संख्या कमी झाली आहे. पुरेसे कुशल कामगार नसल्यामुळे पेणमधील गणपती कारखान्यांच्या मालकांना मोठी कसरत करावी लागते.
गणेशभक्तांचा कल आणि मागणी लक्षात घेऊन दरवर्षी नवीन प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या वर्षीही पेण शहरात अडीचशेहून अधिक प्रकारच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. सुबक मूर्तीसाठी घडवणारे आणि मूर्तीचे रंगकाम झाल्यानंतर आखणी करणारे कुशल कामगार मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे घरातील लोकांना हाताशी धरून उरलेली कामे पूर्ण करण्याची वेळ अनेक कारखानदारांवर ओढवली आहे. कुशल कामगार मिळेनासे झाल्याने काही नामांकित मूर्तिकारांनी तर गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसायच कमी केला आहे.
गणेशमूर्तीचे साचे विकत आणायचे. त्यातून मूर्ती तयार करायच्या आणि नंतर त्या रंगकाम करून अथवा न करताच विकायच्या हा ट्रेंड सर्वत्र पाहायला मिळतो. त्यामुळे सुबक गणेशमूर्ती घडवणारे मूर्तिकार सापडणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे पेण शहराची मातीकाम आणि मूर्तिकलेची परंपरा कायम राखण्यासाठी आता प्रथितयश मूर्तिकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा सुबक आणि आकर्षक गणेशमूर्तीसाठी असणारी पेणची ओळख काळाच्या ओघात नामशेष होण्याची भीती आहे.
पेणमधून तयार मूर्ती घेऊन त्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांमध्ये विक्रीसाठी नेल्या जातात. त्यामुळे मूर्ती वेळेत तयार कराव्या लागतात. कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे गणेशमूर्ती वेळेत तयार करण्यासाठी कारखान्यांच्या मालकांना धावपळ करावी लागते.