आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी पाठविलेल्या ई-मेलवरून त्यांचे ‘इंटरपोल’चे माजी प्रमुख रॉबर्ट नोबल यांच्याशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. मोदी आणि नोबल यांच्यात २१ ते २६ जानेवारी २०१४ या कालावधीत ई-मेलची जी देवाणघेवाण झाली त्याचा आढावा ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने घेतला. या ई-मेलद्वारे अमेरिकेतील स्ट्रॅफोर्ड परगण्यातील मालमत्तेबाबतचा तपशील आहे.
नोबल हे २००० ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत इंटरपोलचे सरचिटणीस होते तरीही भारत सरकारने त्यांच्याशी मोदी यांना लंडनहून भारतात आणण्यासाठी संपर्क साधला नाही. मोदी २०१० पर्यंत तेथे वास्तव्याला होते. नोबल यांचे बंधू जेम्स नोबल यांनी लिहिलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, नोबल कुटुंब किती उत्साहात आहे याची तुला कल्पना नाही, तुझ्यासारखा मित्र मिळाल्याने आम्ही किती भाग्यवान आहोत याचीही कल्पना नाही, तुझ्यामुळेच आम्ही यांसारख्या घरात वास्तव्य करीत आहोत.
याला ललित मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे की, ही खूप चांगली बातमी आहे. तुमच्याशी उद्या प्रत्यक्ष संभाषण करण्यास आपण उत्सुक आहोत. या ई-मेलची प्रत मोदी यांनी रॉबर्ट मोदी यांना पाठविली आहे.
याबाबत तीन ई-मेल पाठविण्यात आले आहेत. या ई-मेलमुळे हितसंबंधांचा तिढा निर्माण होणार का, असे विचारले असता रॉबर्ट नोबल म्हणाले की, कधीही असा तिढा निर्माण होणार नाही, कारण माझ्या भावाचा ‘इंटरपोल’शी काहीही संबंध नाही आणि मोदींनाही ‘इंटरपोल’मध्ये कधीही स्वारस्य नाही. मोदी आणि माझ्या भावाने अमेरिकेतील तीन लाख ६५ हजार डॉलर किमतीच्या मालमत्तेसाठी संयुक्त करार केला.