चंद्रपुरातील घटना 

जमीन व्यवसायावरील आर्थिक मंदीचे सावट आणि लोकांची देणी या विवंचनेमुळे  येथील जमीन व्यावसायिक पदमकुमार जैन लोढा (४२) यांनी पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह दाताळा मार्गावरील म्हाडा कॉलनीत त्यांच्या कारमध्ये मिळाला. यावेळी त्यांच्या खिशात ‘मै हार गया, सो सॉरी’ असे दोन ओळीचे पत्र मिळाले. तीन कोटींची स्थावर मालमत्ता असून सव्वा कोटीची लोकांची देणी असल्याचे या पत्रात लिहिलेले आहे.

येथील स्नेह नगरातील रहिवासी असलेले पदमकुमार जैन लोढा हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता घरून पिस्तूल घेऊन निघाले होते. यावेळी पत्नीने त्यांना पिस्तूल सोबत का घेतले? असे विचारलेसुध्दा. मात्र, आज सौदा होणार असल्याने जवळ मोठी रोकड राहील, तेव्हा सुरक्षेच्यादृष्टीने पिस्तूल जवळ असणे कधीही चांगले, असे सांगून ते घराबाहेर पडले. विशेष म्हणजे घराबाहेर पडता त्यांनी अंगावरील सोने, पॅनकार्ड व इतर सर्व वस्तू घरीच ठेवल्या होत्या. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांसोबत दुपारचे जेवण व सायंकाळचा चहा न चुकता घेणारे पदमकुमार जेवायला व चहाला सुध्दा घरी आले नाही आणि भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पत्नीच्या मनात संशय आला. सायंकाळी उशिरा जैन समाजातील काही प्रतिष्ठितांना सोबत घेऊन पत्नी दीपालीने रामनगर पोलीस ठाण्यात पती पदमकुमार जैन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. विशेष म्हणजे म्हाडा कॉलनीत पदमकुमार जैन यांच्या भ्रमणध्वनीचे ठिकाण दाखवित होते. पोलिस दोन वेळा दाताळा मार्गावरील म्हाडा कॉलनी परिसरात गेले आणि रिकाम्या हाताने परत आले. रात्रीपासूनच त्यांचा सर्वत्र शोध सुरू असतांनाच पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह म्हाडा कॉलनीत त्यांच्या मारुती स्वीफ्ट (एम.एच.३४-एए-९००१) या कारमध्ये मिळाला. त्यांनी पिस्तूलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. रक्ताच्या थारोळय़ात गाडीतच त्याचा मृतदेह पडून होता. या घटनेची माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात म्हाडा कॉलनी परिसरात बघ्यांची गर्दी झाली. जैन समाजातील लोकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून एक पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, एक कार व इतर साहित्य जप्त केले. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पिस्तूल घेतली होती. त्यांच्या पिस्तूलाचा परवाना स्थानिक पातळीवर रद्द झाला होता. मात्र वरिष्ठ पातळीवरून त्यांनी हा परवाना मिळविला अशीही माहिती आहे. त्यांच्या शर्टचे खिशात एक चिठ्ठी मिळाली. त्यावर ‘आय अ‍ॅम पदम जैन’, मै हार गया, सो सॉरी, अशा दोन ओळी लिहिल्या आहेत. तसेच दोन भ्रमणध्वनी क्रमांक लिहिले आहेत. यातील एक भ्रमणध्वनी क्रमांक त्याच्या चुलत भावाचा आणि दुसरा व्यावसायिक भागिदाराचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तीन कोटींची मालमत्ता असून जवळपास सव्वा कोटी रुपये देणी आहे, असेही या पत्रात लिहिले आहे.

मागील अडीच ते तीन वर्षांंपासून जमीन व्यवसायात आर्थिक मंदी आहे. या मंदीचा फटका त्यांना बसला होता. त्यातच लोकांची उसणवारी देणी होती. काहींनी पैशासाठी तकादाही लावला होता. यातून मुक्त होण्यासाठीच त्यांनी आत्महत्या केल्याचीही चर्चा आहे. अत्यंत मनमिळावू, पत्नी, दोन मुले व आई अशा छोटय़ाशा कुटुंबाची काळजी घेणारे पदमकुमार स्वत:च्या आरोग्याचीही विशेष काळजी घेत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनीच कुटुंबाला सावरले होते. त्यामुळे ते अशा पध्दतीने आत्महत्या करतील यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर शनिवारी सायंकाळी येथील शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘नायक नही खलनायक हू मै’

चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक यांनी शनिवारी घटनास्थळी मोबाईलमधून चित्रीकरण करणाऱ्या युवकाला बेदम मारहाण केली तसेच तेथे जमलेल्या  लोकांना शिवीगाळ करून ‘नायक नही खलनायक हू मै’ याचा परिचय करून दिला. एका पोलिस अधिकाऱ्याचे अशा पध्दतीचे रूप बघून जैन समाजातील मान्यवर मंडळी चांगलीच व्यथित झाली. अधिकाऱ्यांना अधिकार असतात म्हणून काय त्यांनी कसेही वागायचे, त्यांना काय शासनाने असे वागायचा परवाना दिला काय या शब्दात जैन बांधवांनी या प्रकाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दरम्यान, नायक यांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पोलिस अधीक्षक नियती ठाकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात अधिक माहितीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी नायक यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीला दाटले, ती प्रसार माध्यमाची प्रतिनिधी नव्हती. केवळ फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर छायाचित्रे टाकण्यासाठी छायाचित्रे काढत होती.