कुंभमेळा कालावधीत साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी साकारलेल्या साधुग्राममध्ये मोक्याची जागा मिळावी, यावरून वैष्णवपंथीय तिन्ही आखाडय़ांमध्ये निर्माण झालेल्या वादावर गुरुवारी सायंकाळी सर्व महंतांनी पडदा टाकत ठप्प झालेले भूखंड वितरण शुक्रवारपासून सुरू करण्याचे जाहीर केले. हरिद्वार येथील हंसदेवाचार्य महाराजांनी या तंटय़ात मध्यस्थाची भूमिका बजावत समेट घडवून आणला. भूखंड वितरणात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत आखाडय़ांनी टोकाची भूमिका स्वीकारल्यामुळे अचानक प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराजांची प्रकृती वाद मिटल्यावर व्यवस्थित झाली. या घडामोडीत प्रशासनाने हा आखाडय़ांमधील अंतर्गत विषय असल्याचे सांगून तटस्थ राहणे पसंत केले.
सिंहस्थासाठी शहरातील तपोवन परिसरात सुमारे तीन लाख साधू-महंतांच्या निवासासाठी ३०० एकर जागेत साधुग्रामची उभारणी पालिका प्रशासनाने केली आहे. साधुग्राममधील १७०० भूखंडांच्या वितरणाचे अधिकार अखिल भारतीय आखाडा परिषदकडे सोपविण्यात आले. त्यानंतर मंगळवारपासून भूखंड वितरणाला सुरुवात झाली होती. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. तथापि, मोक्याचे भूखंड देताना दुजाभाव होत असल्याचा आक्षेप घेऊन वितरण पद्धतीविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली. काही आखाडे व खालशांना अगदी कोपऱ्याच्या आणि कमी प्रमाणात जागा दिल्या जात असल्याची ओरड झाली. या मुद्दय़ावरून निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर आखाडय़ात उभे मतभेद झाल्यामुळे महंत ग्यानदास यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दाखवून थेट अयोध्येला परतण्याचा इशारा दिला. इतकेच नव्हे तर, आखाडा परिषदेचे अध्यक्षपद सोडण्याचे सूचित केले. या घडामोडींमुळे गुरुवारी दिवसभर भूखंड वितरण प्रक्रिया ठप्प होती. सकाळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी ग्यानदास महाराज यांची भेट घेतली. हरिद्वारचे हंसदेवाचार्य महाराजांनी हा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तिन्ही आखाडे प्रमुखांशी त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. सिंहस्थात साधू-महंतांमधील मतभेद चव्हाटय़ावर येणे योग्य नसल्याचे त्यांनी पटवून दिल्याचे सांगितले जाते.
हंसदेवाचार्य यांच्या शिष्टाईमुळे उपरोक्त आखाडय़ांनी भूखंड वितरणाचा विषय अधिक ताणून न धरण्याचे मान्य केले. सायंकाळी उशिरा तिन्ही आखाडय़ांचे प्रमुख व महंत ग्यानदास महाराज यांची संयुक्त पत्रकार परिषद होऊन त्यात अंतर्गत प्रश्न सामंजस्याने सोडविण्यात आल्याचे सांगण्यात आले. भूखंड वितरणात आखाडय़ांमध्ये काही वाद नव्हते अशी सारवासारव करण्यात आली. आदल्या दिवशी आखाडा परिषदेचे अध्यक्षपद सोडण्याचा इशारा देणाऱ्या ग्यानदास महाराजांनी आपण आखाडा परिषदेचे नव्हे तर, स्थानिक पातळीवर सिंहस्थ नियोजनासाठी देण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद सोडण्याचे म्हटल्याचे नमूद केले.