मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी आणि सल झालेले दगड हटवण्याच्या कामाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गावर वळवण्यात आली. रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान संबंधित यंत्रणांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव व नियोजनच नसल्याने हे काम पूर्ण होण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे.
दृतगती मार्गावर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. एमएसआरडीसी आणि सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली होती.
एमएसआरडीसीचे मंत्री एकनाथ िशदे यांनी या परिसराचा आढावा घेऊन सल झालेले दगड आणि संभाव्य दरडी हटवण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर शुक्रवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी मोठय़ा प्रमाणात यंत्रणा तनात ठेवण्यात आली होती.
राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान यावेळी द्रुतगती मार्गावरील बोरघाट ते खालापूर टोलदरम्यान बंद करण्यात आली होती. हलकी वाहने खोपोली, शीळफाटामाग्रे वळविण्यात आली असून अवजड वाहतूक मात्र बंद करण्यात आली. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक, पोलीस उपअधीक्षक बी.पी. कल्लुरकर उपस्थित होते. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची जादा कुमक तनात करण्यात आली होती. जुना महामार्ग अरुंद असल्याने वाहनचालकांना सूचना देणारे अनेक फलक रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत. त्यामुळे जुन्या मार्गाने वाहतूक वळविल्यानंतरही वाहतूक संथपणे परंतु सुरळीतपणे सुरू होती.
दरम्यान आडोशी येथील दरडी आणि सल झालेले दगड काढण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी यावेळी विविध यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. सकाळी १०  वाजता काम सुरू होणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष काम सुरू व्हायला १२ वाजले. यानंतर कामाला सुरू करण्यात आली. यावळी दरड काढण्यासाठी ६० मीटर उंचीच्या क्रेनची गरज असताना प्रत्यक्षात ४० मीटर क्रेन उपलब्ध असल्याचे दिसून आले. या क्रेनच्या साहाय्याने दगड काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
मात्र यातही यश येत नसल्याने चक्क कामगाराला चढवण्यात आले. त्यानंतर पहारीच्या साह्याने सुटे झालेले दगड खाली ढकलण्याचे काम त्याने सुरू केले. याच पद्धतीने काम सुरू राहिले तर अनेक दिवस काम चालण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.