भीमाशंकरच्या कुशीत वसलेले माळीण या चिमुकल्या गावाचा दरडीने घास घेतल्यानंतर आता डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. रायगड जिल्ह्य़ात अशा प्रकारची ८४ गावे असून त्यांना भूस्खलनाचा धोका असल्याचे २००५ मध्ये करण्यात आलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणातच स्पष्ट झाले होते. माळीण दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर आता जिल्हा प्रशासाने या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  माळीण दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्य़ातील संभाव्य दरडग्रस्त गावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २५ आणि २६ जुल २००५ मध्ये प्रलयंकारी पावसात रायगड जिल्ह्य़ात महाड पोलादपूर परिसरात मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. या भूस्खलनाच्या घटनांमध्ये १९० जणांचा मृत्यू झाला होता. तर पोलादपूर तालुक्यात १३ जण दरडीखाली गाडले गेले होते. रोहा तालुक्यातही आठजणांचा मृत्यू झाला होता. भूस्खलनांच्या या घटनांनंतर या ठिकाणी भूवैज्ञानिकांकडून डोंगरउतारावर वसलेल्या सगळ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानंतर जिल्ह्य़ातील ८४ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे सूचित करण्यात आले होते.
*आपत्कालीन परिस्थतीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.