राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने २०१३-१४ या वर्षासाठी देण्यात येणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांना जाहीर करण्यात आला आहे.
पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संगीत आणि गायन क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं.जितेंद्र अभिषेकी, पं.हृदयनाथ मंगेशकर, ज्योत्सना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, रवींद्र जैन, प्यारेलाल शर्मा, मन्ना डे, सेहल भाटकर, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शाह, अशोक पत्की यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कल्ले यांनी १९६० पासून आकाशवाणीवर ‘अ’ श्रेणी गायिका म्हणून काम केले. २०० हिंदी तर १०० मराठी चित्रपटगीतांना त्यांनी आवाज दिला. त्यांनी १०० पेक्षा अधिक भजने, भक्तीगीते व गजला गायल्या आहेत. त्यांना माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते युथ फेस्टीवल पुरस्कार तर माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १९५७ मध्ये गायनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९५८ मध्ये अखिल भारतीय सुगम संगीताचे पहिले पारितोषिक, सेहगल मेमोरीयलतर्फे देण्यात येणारा गोल्डन व्हॉईस पुरस्कार, पी.सावळाराम प्रतिष्ठान आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘गंगा जमुना पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
भिमाभाऊ सांगवीकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार
‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ धुळे जिल्ह्यातल्या शिरपुर तालुक्यातील ज्येष्ठ तमाशा कलावंत भिमराव तोताराम गोपाळ उर्फ भिमाभाऊ सांगवीकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो.