डाळ उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या लातूरचा टक्का विविध कारणांमुळे आता घसरणीला लागला असून, सोलापूरची अग्रस्थानाकडे आगेकूच सुरू आहे. लातुरात उद्योजकांना पोषक वातावरण नाही व त्यांना प्रोत्साहन दिले जात नाही, यामुळे हे चित्र वाढीस लागल्याचे दिसून येते.
लातूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून डाळ उद्योग सुरू आहे. दरवर्षी या उद्योगात वाढ होत आहे. आजमितीस सुमारे ७० कारखाने सुरू असून, दररोज १९ ते २० हजार क्विंटल डाळ तयार होते. ‘बँड्रनेम’ने लातूरची डाळ उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विकली जाते. कर्नाटक व आंध्रच्या सीमेवरील लातूरमध्ये डाळवर्गीय वाणाची आवक मोठय़ा प्रमाणात होते. लातूरचा हा उद्योग वाढीस लागण्यासाठी प्रारंभी अनुकूल वातावरण होते. लातूर शहर विकसित होत गेले, तसतसे हा उद्योग भरभराटीला येऊ लागला. गेल्या काही दिवसांपासून मात्र विविध कारणांमुळे डाळ उद्योग अडचणीत येऊ लागला. त्यात प्रामुख्याने हमालांनी पुकारलेला संप, रविवारी हमालांच्या सुटीमुळे कारखाने बंद राहतात. बदली हमाल कामावर येत नाहीत. मालकाने पर्यायी व्यवस्था केली तर तीही करू दिली जात नाही, त्यामुळे त्याचा थेट फटका बाजाराला बसतो.
हमालीचे दर अधिक, ५० किलोचेच पोते बाजारपेठेत आणले जाण्याची सक्ती अशा कारणांमुळे उत्पादन खर्चात वाढ होते. या कारणांमुळे उद्योजक त्रासून जात आहेत. त्यामुळे आहे ते उद्योग कसेबसे चालवणे, नव्याने उद्योग लातुरात सुरू करण्याची इच्छाच उद्योजकांना होत नाही. त्यात औद्योगिक वसाहतीत जागा मिळत नाही. त्यासाठी जंगजंग पछाडावे लागते व औद्योगिक वसाहतीबाहेर जागेचे भाव न परवडण्यासारखे असल्यामुळे उद्योग सुरू करून ‘सुखातील जीव दु:खात’ घालायची कोणाची तयारी होत नाही.
लातूरपासून के वळ ११० किलोमीटर अंतरावरील सोलापूर शहर हे कर्नाटक व आंध्र सीमेला अधिक जवळचे आहे. सोलापुरात रेल्वेचे जाळे आहे. शहर मोठे असल्यामुळे व कामगारांचे शहर म्हणून सर्वाना ज्ञात असणाऱ्या सोलापुरात तुलनेने कमी पैशात कामगार उपलब्ध होतात. हमालांच्या संघटना करून उद्योजकांना त्रास देण्याची वृत्ती नाही, शिवाय लातूरपेक्षा निम्म्या दरात उद्योगासाठी सहज जागा उपलब्ध होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने सोलापुरात डाळ उद्योग वाढत आहे. आजमितीस २० ते २२ हजार क्विंटल डाळ तयार करण्याची क्षमता असणारे कारखाने उभारले आहेत. डाळ उद्योगांना पूर्ण सहकार्याची भूमिका लातूरपेक्षा सोलापुरात अधिक घेतली जात असल्याने उद्योजक सोलापुरात नवा उद्योग सुरू करण्याकडे लक्ष देत आहेत. लातुरात उद्योजकांना पोषक वातावरण नाही. त्यांना प्रोत्साहन दिले जात नाही, अशी भावना वाढीस लागत असल्यामुळे सोलापूरने आघाडी घेतली आहे.