जिल्ह्य़ात नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेवर भाजपचे प्राबल्य, आता महापालिका लक्ष्य

लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला, पण नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपकडून काँग्रेसला पराभव चाखावा लागला. हाच कल लातूर महानगरपालिकेत कायम राहणार का, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महापालिकेच्या १८ प्रभागातून बहुसदस्यीय पद्धतीने ७० सदस्यांची निवड केली जाणार आहे. शहरातील २ लाख ७८ हजार ३७४ मतदार   मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महापालिका व पूर्वीच्या नगरपालिकेतही पाच वर्षांचा अपवाद वगळता काँग्रेसचीच सत्ता कायम राहिली. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती. भाजपला भोपळाही फोडता आला नाही. महापालिका निवडणुकीच्या रचनेत पूर्वीच्या वॉर्ड पद्धतीऐवजी आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धत होणार असून कमीत कमी १३ हजार ५०० मतदार एका प्रभागात असणार आहेत. गेल्या निवडणुकीत विलासराव देशमुख स्वत उतरले होते. महापालिकेची सत्ता कोणत्याही स्थितीत आपल्याच हाती राहावी यासाठी तब्येत बरी नसतानाही ते ठाण मांडून लातुरात बसले होते. यावेळी विलासराव देशमुखांच्या गरहजेरीत होणारी ही निवडणूक आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला व भाजपचा उदय झाला. ग्रामीण भागातील व जिल्हय़ातील सर्व मतदारांवर प्रभाव पाडू शकेल असे नेतृत्व काँग्रेसकडे नव्हते. महापालिका क्षेत्रात आमदार अमित देशमुख हा काँग्रेसचा चेहरा असेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक मंडळींनी काँग्रेससोबत आघाडी नको, असा ठराव प्रदेश कार्यालयाकडे पाठविला आहे. लातूरचे प्रभारी आमदार राणा जगजीतसिंह गुरुवारी लातुरात डेरेदाखल झाले असून ते कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. प्रदेश पातळीच्या मंडळींवर लातुरात काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही याचा निर्णय होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला व त्यांचे संख्याबळ घटले. पुन्हा हाच प्रयोग महापालिकेत केला तर काय होईल याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसला लागली आहे.

भाजपचे नियोजन

भाजपने नगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने महापालिका निवडणुकीची तयारी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली आहे. सर्वच पक्षातील मंडळी भाजपत येण्यास उत्सुक असल्यामुळे भाजपची गर्दी वाढते आहे. भाजपने ज्येष्ठ, नवे कार्यकत्रे यांची मोट बांधण्याबरोबरच जुन्या मंडळींना सक्रिय केले आहे. महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजप करते आहे. शिवसेनेची अवस्था वाईट आहे. विद्यमान सहा नगरसेवकांपकी दोन नगरसेवक भाजपत तर एका नगरसेवकाने राजीनामा दिला आहे. शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. कदाचित भाजपबरोबर युती करण्यासाठीही प्रयत्न होऊ शकतात.

काँग्रेसची आघाडीची तयारी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील अपयशानंतर आ. अमित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याची आपली तयारी असल्याचे जाहीर केले आहे व त्यादृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम िरगणात उतरली असून प्रकाश आंबेडकर व महाराष्ट्र विकास आघाडी यांना सोबत घेऊन मुस्लीम, दलित, ओबीसी ऐक्याचा प्रयोग केला जाणार आहे. एमआयएमचे प्रमुख असुसुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पालिका निवडणुकीत ओवेसी सर्वाचे गणित बिघडवणार हे पहिल्या टप्प्यात तरी दिसते आहे.

untitled-12