पिण्याच्या पाण्याच्या स्रोतातील दोष दूर करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून विशेष उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे साथीच्या रोगाचा उद्रेक झाला नाही. या पाश्र्वभूमीवर हा उपक्रम आता सर्वच जिल्हा परिषदांमध्ये राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. लातूर जि.प.ने राबवलेल्या जलसुरक्षा योजनेचे या निमित्ताने कौतुक केले जात आहे.
जि. प. आरोग्य विभागामार्फत दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासले जातात. ज्या िवधनविहिरीवर हातपंप व वीजपंप बसवले आहेत व ज्या सार्वजनिक विहिरीवरून वर्षभर पिण्याचे पाणी वापरले जाते, ते पाणी दरवर्षी पावसाळय़ात पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली की दूषित होते. त्यामुळे हातपंप, वीजपंपाचे क्लोरीन वॉश, सार्वजनिक विहिरींचे, आडांचे क्लोरिनेशन करून घेतले जाते. त्यामुळे दूषित पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. राज्याच्या सरासरी प्रमाणापेक्षा लातूर जिल्हय़ातील दूषित पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. राज्याचे सरासरी प्रमाण ३० टक्के, तर लातुरात २७ टक्के आहे.
या वर्षी जून महिन्यात जिल्हय़ाच्या सर्व तालुक्यांतील १ हजार ३३७ पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासण्यात आले. पकी ३५७ स्रोतांमध्ये दोष आढळून आले. जिल्हय़ातील तालुकानिहाय दूषित आढळून आलेले स्रोत व त्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे : अहमदपूर १६५पकी ६६, ४० टक्के. औसा २००पकी ९९, ५० टक्के. चाकूर १९१पकी ५५, २९ टक्के. देवणी ३१पकी ११, ३५ टक्के. जळकोट ९९पकी ८, ८ टक्के. लातूर १७४पकी ३५, २० टक्के. निलंगा १११पकी १७, १५ टक्के व रेणापूर ७४पकी २०, २७ टक्के.
या वर्षी चांगला पाऊस झाला नसल्यामुळे पाण्याची पातळी वाढली नाही. जुलैच्या अखेरीस क्लोरिनवॉश व क्लोरिनेशन करून त्यानंतर पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली जाते. जिल्हय़ात ७८७पकी केवळ २ ग्रामपंचायतींत पिण्याच्या पाण्याची तीव्र जोखीम असून त्यावर उपाययोजना केली जात आहे. २५४ ग्रामपंचायती अल्प जोखमीच्या आहेत, तर ५३१ ग्रामपंचायतींतील पाण्याचे स्रोत सर्वसाधारण आहेत. जिल्हय़ात १६ गावांतील १७ स्रोतांमध्ये फ्लोराइडचे प्रमाण १.५ मिलिग्रॅमपेक्षा अधिक आढळल्यामुळे हे पाण्याचे स्रोत बंद करून पर्यायी स्रोत उपलब्ध करण्यात आले.
प्रत्येक ग्रामपंचायतीत पिण्याच्या पाण्याची काळजी घेण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त केला असून, दर महिन्याला पाणी तपासणी नमुनेही मागवले जातात. उदगीर व निलंगा येथे लघु प्रयोगशळा सुरू केली असून, पाण्याच्या स्रोतांची नमुना तपासणी येथे केली जाते. ग्रामस्थांमध्ये पाण्यासंबंधी जागरूकता निर्माण होत आहे. जि.प.ने ही काळजी घेतल्यामुळे गेल्या २ वर्षांत जलजन्य आजाराचे प्रमाण आटोक्यात आले असून, एखाद्या गावात साथरोगाचा उद्रेकही झाला नाही.
लातूर जि.प.ने यशस्वीपणे राबविलेल्या या मोहिमेचे राज्य सरकारने कौतुक केले असून, याची अंमलबजावणी राज्यभरात व्हावी, यासाठी खास अध्यादेश काढण्यात आला. जि.प. आरोग्य सभापती कल्याण पाटील, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे व मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
हिंगोलीत पावसाची रिपरिप
जिल्ह्यात ४ दिवसांपासून भीज पावसाची रिपरिप सुरू असल्याने खरीप पिकांच्या पेरणीला पोषक वातावरण तयार झाले आहे. भीज पावसामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०.५८ टक्के पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच तारखेला ६७.४६ टक्के पाऊस पडल्याची नोंद होती.
बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्य़ात पडलेल्या पावसाची नोंद मिमीमध्ये, कंसात आतापर्यंतचा पाऊस : िहगोली ११.८६ (७७.१५), वसमत १४.४३ (८६.८६), कळमनुरी १६.८३ (७०.८७), औंढा नागनाथ १८.७५ (१२९.२५), सेनगाव १९.६७ (१००.८४). जिल्ह्यात सरासरी १६.३१ मिमी पावसाची नोंद आहे. जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र ३२३७.३० हेक्टर असून मुगाची पेरणी ३.८४ टक्के, तर उडीद ३.३७, मका २.५८ टक्के या प्रमाणे क्षेत्र आहे. भीज पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस, तीळ, ज्वारी या आंतरपिकांची पेरणी होईल. या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून मूग, उडीद, खरीप भुईमूग ही पिके हातून गेली आहेत.
जालना जिल्हय़ात दिवसभर पाऊस
जिल्हय़ात बुधवापर्यंत सरासरी ८४.६३ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत हा पाऊस ३१.७७ टक्के आहे. मंगळवार व बुधवारी जिल्हय़ाच्या काही भागात कमीअधिक पाऊस पडला. बुधवारी दिवसभर जालना शहर व जिल्हय़ाच्या बहुतेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. परंतु मोठय़ा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
आतापर्यंत जिल्हय़ात सर्वाधिक १३५.६० मिमी (५१.९१ टक्के) पाऊस परतूर तालुक्यात, तर सर्वात कमी ४७ मिमी (१८.३१ टक्के) पाऊस मंठा तालुक्यात झाला. जालना १०३ मिमी, बदनापूर ५०, भोकरदन ११८.२५, जाफराबाद ७३.६०, अंबड ८०.१४ व घनसावंगी ६९.४३ मिमी याप्रमाणे अन्य तालुक्यांतील पावसाची नोंद आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्हय़ातील अपेक्षित सरासरी वार्षिक पाऊस ६८८.२१ मिमी आहे. त्या तुलनेत आतापर्यंत जिल्हय़ात सरासरी १२.२९ टक्के पाऊस झाला आहे.