मराठवाडय़ातील नव्या महसूल आयुक्तालय मुख्यालयावरून लातूर व नांदेडदरम्यान वाद सुरू असतानाच लातूरकरांनी आता स्वतंत्र विद्यापीठाची मागणी पुढे रेटली आहे. ‘स्वाराती’ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या आगामी बैठकीसमोर हा विषय ठेवण्यात आला आहे.
नांदेड विद्यापीठाच्या स्थापनेस येत्या सप्टेंबरमध्ये २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या दरम्यान, विद्यापीठाने लातूर येथे परिपूर्ण उपकेंद्र स्थापन केले. तेथे काही अभ्यासक्रमांसह प्रशासकीय कामकाजही पार पाडले जाते. महसूल आयुक्तालयाचे मुख्यालय नांदेड येथे करण्याचा मुद्दा मांडला जाताना येथे असलेले विद्यापीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जात होता. त्या आधारे सरकारने आयुक्तालयाचे मुख्यालय नांदेडला करण्याचा निर्णय घेतला. परंतु विद्यापीठाच्या येत्या सोमवारी (दि. २९) होणार असलेल्या व्यवस्थापन परिषद बैठकीसमोर लातूर जिल्हय़ातील सदस्य प्रा. डॉ. पी. एन. देशमुख यांनी लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो विषयपत्रिकेवर आला आहे.
लातूर जिल्हय़ात १४०च्या आसपास महाविद्यालये असून, उच्च शिक्षणातील सुविधा वाढविण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा, असे डॉ. देशमुख यांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने स्वत:हून आपले कार्यक्षेत्र कमी करू नये, असे यावर एका जागरूक सदस्याने म्हटले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षांच्या पाश्र्वभूमीवर कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी अलीकडेच मुलाखत दिली, या सबंध मुलाखतीत त्यांनी मराठवाडय़ात आणखी एक विद्यापीठ निर्माण होण्याची गरज मांडली नव्हती. उलट हेच विद्यापीठ अधिक सक्षम व परिपूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. विदर्भासारख्या मोठय़ा प्रदेशात केवळ दोन बिगर कृषी विद्यापीठे आहेत. मराठवाडय़ात तशीच स्थिती आहे. त्यामुळे नांदेड विद्यापीठाचे विभाजन अनेकांना अशक्य वाटते. लातूरकरांना स्वतंत्र विद्यापीठाची गरज वाटत असेलच, तर त्यांनी थेट सरकारकडे जावे, असे मत येथील काही संबंधितांनी मांडले.