निसर्गाने कृपा केली अन् आठवडय़ाच्या आतच धनेगाव येथील मांजरा धरण काठोकाठ भरले. आता लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला व धनेगाव धरणातील पाणी लातूरकरांना मिळेल, अशी आशा असतानाच महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे पाणी असूनही आठवडय़ातून दोनदा पाणी मिळण्यास किमान दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मांजरा धरण ५० टक्के भरल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी धरणावर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसह जलपूजन केले. रविवारी धरण भरत आल्यानंतर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धरणाला भेट दिली.

शंभर टक्के धरण भरल्यानंतर महापौर दीपक सूळ, महापालिका आयुक्त रवींद्र पांढरे, स्थायी समिती सभापती विक्रम गोजमगुंडे यांच्यासह मकरंद सावे, चंद्रकांत चिकटे या महापालिकेच्या ताफ्याने सोमवारी धरणावर जाऊन जलपूजन केले. जलयुक्त लातूरच्या पुढाकाराने नॅचरल शुगरचे प्रमुख बी. बी. ठोंबरे यांनी सोमवारीच जलपूजनाचा कार्यक्रम घेतला. या वेळी लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांसह अनेक जण उपस्थित होते. मंगळवारी विकास कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, माजी आमदार वैजनाथ िशदे, धीरज देशमुख यांनी जलपूजन केले. तब्बल एका तपानंतर मांजरा धरण काठोकाठ भरल्यामुळे धरण क्षेत्रातील मंडळींना आनंद होणे स्वाभाविक आहे. लातूर महापालिकेची अवस्था मात्र ‘देव आला द्यायला अन् पदर नाही घ्यायला’ अशी झाली आहे. धनेगाव धरण कोरडेठाक पडल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून लातूर शहराला धरणातून पाणीपुरवठा करणे अशक्य असल्यामुळे महापालिकेने ३३ केव्ही लाइनची वीज तोडून टाकली होती. शहराला टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे धरणावर पंिपग स्टेशनवर कमी लोक कामावर होते. ऑगस्ट महिन्यात पंिपग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरची तांब्याची तार व अन्य साहित्य सुमारे ३५ ते ४० लाखांचे चोरीस गेले. कर्मचाऱ्यांना याची कल्पनाही नव्हती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली व ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणखीन पाच दिवसांची मुदतवाढ निविदेला देण्यात आली. धरणावर असलेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होण्यास किमान २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातील अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर धनेगाव धरणावर नेऊन बसवला जाणार आहे. वीजजोडणी मिळणे व पाणी उपसा होणे या प्रकाराला किमान चार दिवस लागतील. घटस्थापनेच्या दिवशी धनेगाव धरणातील पाणी लातूरकरांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी असल्यामुळे निम्म्या क्षमतेने पंिपग होणार असल्यामुळे महापालिकेने कितीही प्रयत्न केला तरी आठ दिवसांत एकदाच लातूरकरांना पाणी देता येऊ शकते. जर ट्रान्सफॉर्मर वेळेत दुरुस्त झाला तर दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी आठवडय़ातून दोनदा पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते.

भाजपचे मनपा प्रचारप्रमुख शैलेश गोजमगुंडे, सुधीर धुत्तेकर आदींच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त रवींद्र पांढरे यांची भेट घेऊन त्यांना दररोज लातूरकरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निवेदन दिले. भाजपसह सर्वाचीच अपेक्षा महापालिकेने कार्यक्षम होऊन लातूरकरांना आता धरणात पाणी असल्यामुळे कोणतीही सबब न सांगता लवकरात लवकर रोज पाणी द्यावे अशी आहे.