शेतकऱ्यांना धुळपेरणीसाठी निम्न दुधना प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्यांत पाणी सोडण्यात आले. परभणी, सेलू, जिंतूर व मानवत तालुक्यांतील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे.
दुष्काळाचे चटके सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या हेतूने निम्न दुधना प्रकल्पातून चौथ्यांदा उजव्या व डाव्या कालव्यांत पाणी सोडण्यात आले. प्रकल्पातून पाणी सोडले, तरी शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज मिळाली, तरच या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकणार आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात शंभर क्युसेकने, तर उजव्या कालव्यात १४ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. प्रकल्पाचा डावा कालवा लांबीने अधिक आहे. त्यामुळे या कालव्यात शंभर क्युसेकने पाणी सोडले. हे पाणी जवळपास ७० किमी अंतरापर्यंत पोहोचणार आहे. उजव्या कालव्याचे काम अर्धवट असल्यामुळे या कालव्यात १४ क्युसेकने पाणी सोडून १५ किमी अंतरापर्यंत हे पाणी जाईल. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीची कामे पूर्ण केली. सेलू व परिसरात कापसाची मोठय़ा प्रमाणात लागवड होते. अनेक शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात कापसाची लागवड करतात. शेकडो शेतकरी धुळपेरणीही करतात. प्रकल्पातील पाण्याचा पेरणीसाठी उपयोग व्हावा, या साठी दोन्ही कालव्यांत पाणी सोडण्यात आले. हे पाणी ४ दिवस कालव्यात सोडण्यात येणार आहे.
यंदा प्रकल्पात चांगला पाणीसाठा होता. त्यामुळे पिण्यासह सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग झाला. दुष्काळाचे चटके कमी होण्यास मदत झाली. दरम्यान, यापूर्वी पिण्याच्या पाण्याची टंचाई व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दुधना नदीपात्रातही प्रकल्पातून पाणी सोडले होते. त्यामुळे दुधना नदीकाठावरील गावांना दिलासा मिळाला. आता पुन्हा दोन्ही कालव्यांत पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी या पाण्याची मदत होणार आहे.