सांगली-सातारा विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवार यांना हादरा बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांचा पराभव केला आहे. गोरे यांचा पराभव हा अजित पवार यांच्यासाठी हादरा मानला जात आहे.

सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघात ५७० मतदार आहेत. या भागातील दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत आहे. तर सांगली महापालिकेत काँग्रेसचे वर्चस्व आहे. या भागातील अनेक नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीला बहुमत होते. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे डॉ. पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम तर राष्ट्रवादीतर्फे रासपमधून आलेले शेखर गोरे हे रिंगणात उतरले होते.

सांगली सातारा मतदार संघात मोहनराव कदम यांना ३०९ मत मिळाली. शेखर गोरे यांना २४६ मत मिळाली. अपक्ष उमेदवार शेखर माने यांना २ तर दुसरे अपक्ष उमेदवार मोहनराव गु. कदम यांनाही २ मत मिळाली. एकूण मतांपैकी १० मत बाद ठरवण्यात आली. गोरे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला हादरा बसला आहे. या भागातून राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात होता. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावलत रासपमधून आलेल्या गोरे यांना उमेदवारी दिल्याने नाराजी पसरली होती. गोरे यांना उमेदवारी देण्याची अजित पवारांची चाल फसल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात रंगली आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे मतदार हे अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले आणि जयंत पाटील या तीन गटांत प्रामुख्याने विभागलेले आहेत. ही गटबाजीही राष्ट्रवादीला महागात पडल्याचे दिसते.